राज्याच्या प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाचे आवार म्हणजे चिखलाचे आगार झाले आहे.
दुरुस्तीमुळे मंत्रालयाच्या आवाराची पार दैना झाली आहे. विस्तारित इमारतीत प्रवेशद्वारासमोर चक्क चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. चिखल तुडवीतच कर्मचारी आणि भेटीसाठी येणाऱ्यांना ये-जा करावी लागते. महिला कर्मचाऱ्यांचे गेले दोन दिवस फारच हाल झाले. एवढा  चिखल होऊनही बांधकाम करणारा ठेकेदार किंवा देखभालीचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला काही सुधारणा करण्याचे सुचलेले नाही. पावसाळा सुरू झाल्यावर चिखल होईल हे लक्षात घेऊन उपाय योजण्याची ठेकेदार आणि बांधकाम विभागाची जबाबदारी होती, पण दोघांनीही दुर्लक्ष केले आहे.