निर्देशांकात १९४ अंशांनी घसरण; निफ्टीमध्येही उतरण

गेल्या काही दिवसांपासून व्यापार, उद्योग, बाजार आदी सर्वच क्षेत्रांत निराशेचे ढग जमा झालेले असताना यंदाची दिवाळी भांडवली बाजारामध्ये कशी जाते, याकडे अर्थक्षेत्राचे लक्ष लागून होते. नव्या २०७४ संवत्सराची सुरुवात करताना भांडवली बाजारामध्ये गुरुवारी ‘सेन्सेक्स’चा आपटीबार पाहायला मिळाला. मुहूर्ताच्या तासाभराच्या व्यवहारात प्रमुख निर्देशांक ०.६३ टक्क्यापर्यंत घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स १९४.३९ अंश घसरणीसह ३२,३८९.९६ वर बंद झाला. तर निफ्टीतील ६४.३० अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १०,१४६.५५ वर स्थिरावला आणि निराशेची दिवाळी भांडवली बाजारामध्येही सुरू झाली.

गुरुवारी सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत होते. बँक निर्देशांकामध्ये सर्वाधिक घसरण झाली. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या अनेक बँकांच्या वाढत्या अनुत्पादित मालमत्ता प्रमाणाबाबत व्यक्त झालेली ही चिंता होती. तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढत असल्याने गुरुवारी भांडवली बाजारातील सूचिबद्ध तेल व वायू कंपन्यांच्या समभागांवर दबाव दिसला.

दुकानदार, व्यापारी, उत्पादक चिंतेत

मुंबई : अचानक लागू झालेली नोटाबंदी, नवी अप्रत्यक्ष करप्रणाली, वस्तू व सेवा कर अशी सामान्यांप्रमाणेच तमाम उद्योग क्षेत्रावर विपरीत परिणाम करणाऱ्या घटनांची छाया नव्या संवस्तरावर आहे. २०७४चे हिंदू संवत्सर गुरुवारी सुरू झाले असताना उत्पादक निर्माते, मोठे व्यापारी तसेच किरकोळ दुकानदार खरेदी होत नसल्याने चिंतेत आहेत. किरकोळ तसेच घाऊक बाजाराच्या तुलनेत यंदा ऑनलाइन मंचावर वस्तूंची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात झाली. पर्यावरण जागरूकतेमुळे यंदा फटाक्यांची विक्रीही कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. केवळ देशातील वाहन क्षेत्राने व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम काळ नोंदविला आहे. मंदीत असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचे नोटाबंदीमुळे आणखी कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी जाहीर होण्याच्या तास-दोन तासाच्या अवधीत मिनिटाचीही सवड न मिळालेल्या सराफ व्यावसायिकांना पुढील कालावधी मात्र संथ गेला. हे चित्र अगदी यंदाचा दसरा, चालू आठवडय़ातील धनत्रयोदशीपर्यंत कायम होते.

थोडा इतिहास

गेल्या १० वर्षांत ७ वेळा सेन्सेक्सने दिवाळीमध्ये तेजी दाखविली आहे. २००८ मधील मुहूर्ताच्या व्यवहारात निर्देशांकात दमदार ५.८ टक्क्यांची उसळी होती. दोन वेळा दोन मुहूर्ताला निर्देशांक उणे स्थितीत राहिला आहे.