मुलावर अविश्वास की भावाला गोंजारण्याचा प्रयत्न?

देशाच्या राजकारणात समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव हे अत्यंत बेभरवशाचे नेते मानले जातात. कधी कोणती भूमिका घेतील याची काहीही हमी देता येत नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर यादव कुटुंबियात यादवी सुरू झाल्याने आधीच पक्षात संभ्रम असताना निवडणुकीनंतर निवडून येणारे आमदार आणि पक्षाचे संसदीय मंडळ मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेईल, अशी गुगली टाकून मुलायमसिंग यादव यांनी आणखी घोळ घातला आहे. अर्थात, पुत्र व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबद्दलची नाराजी की भाऊ शिवपाल यादव यांना गोंजारण्याचा प्रयत्न आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली. तरुण वयात मुख्यमंत्रीपद मिळालेले ओमर अब्दुल्ला यांच्यापाठोपाठ अखिलेश ही नेत्यांची मुले आपला प्रभाव पाडू शकली नाहीत हे अधोरेखित झाले आहे.

‘निवडून आलेले आमदार आणि पक्षाचे संसदीय मंडळ मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेईल’, असे विधान मुलायमसिंग यांनी लखनौमध्ये केल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कारभाराबद्दल स्वत: मुलायम फारसे खुश नाहीत हे त्यांच्या वक्तव्यांवरून यापूर्वीच स्पष्ट झाले. अखिलेश हे पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच अमरसिंह यांच्यासारख्या ‘उद्योगी’  नेत्यांना दूर ठेवावे याकरिता आग्रही होते, पण मुलायमसिंग यांनी निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक ताकद उभी करण्यात माहिर असलेल्या अमरसिंह यांना जवळ केले. भाऊ शिवपाल यांच्या कलाने सारे घेतले. भाऊ शिवपाल यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद, त्यांची काढलेली खाती परत करून नाराजी दूर करण्यावर भर दिला. भावाला झुकते माप देत पुत्र अखिलेश यादव यांचा पाणउतारा केला. यावरून मुलायमसिंग यांना मुलाबद्दल फार काही आपुलकी राहिलेली नाही हेच स्पष्ट होते.

शिवपाल यादव यांनी पक्ष सोडल्यास समाजवादी पक्षाचे नुकसान होईल, असे मत मुलायम यांनी मध्ये व्यक्त केले होते. महिनाभरातील या वादात मुलायमसिंग यादव यांनी मुलाला सूचक संदेश देत अमरसिंग, शिवपाल यादव या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील नेत्यांना जास्त महत्त्व दिले. यावरून मुलायम यांचा मुलावर विश्वास राहिलेला नाही हेच स्पष्ट होते. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय नवे आमदार घेतील, असे जाहीर करून मुलायमसिंग उर्फ नेताजी यांनी भाऊ शिवपाल यांच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती येताच अखिलेश यांच्या समर्थकांनाच काकांनी (शिवपाल) यांनी घरचा रस्ता दाखविला. उमेदवारांच्या यादीतही बदल केला.  दुसरीकडे आपल्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुकांकरिता अखिलेश यांनी सारी तयारी केली आहे. समाजवादी पक्षातील या यादवीचा फायदा घेत बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी, या पक्षाला मते दिल्यास ते फूकट जाईल, असा प्रचार सुरू केला आहे.

ओमरपाठोपाठ अखिलेशही ?

जम्मू आणि काश्मिरमध्ये डॉ. फारुक अब्दुल्ला किंवा उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यांनी मोठय़ा विश्वासाने राज्याचे नेतृत्व आपल्या मुलांकडे सोपविले. पण दोन्ही तरुण मुख्यमंत्री तेवढे यशस्वी झालेले नाहीत. ओमर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा पराभव झाला. उत्तर प्रदेशमध्ये सद्यस्थितीत बसपा आणि भाजपमध्ये लढत होण्याची चिन्हे आहेत. समाजवादी पार्टी स्पर्धेत नसल्याचे चित्र आहे. अखिलेश यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या, पण स्वपक्षीयांची साथ न मिळाल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण व अशोक चव्हाण या पितापुत्राने मुख्यमंत्रीपद भूषविले. २००९ मध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत काँग्रेसला सत्ताही मिळाली, पण जमीन घोटाळ्यात अशोकरावांना फटका बसला व राजकीय कारकिर्दीवर परिणाम झाला.  पंजाबमध्ये आपले पुत्र सुखबिरसिंग हे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होणार नाहीत याचा अंदाज आल्यानेच मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी मुख्यमंत्रीपद सोडले नाही. सुखबिरसिंग यांना संधी असूनही वडिलांनी ती पूर्ण होऊ दिली नाही. तामिळनाडूमध्येही द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी पुत्र स्टलिन यांच्यावर जबाबदारी टाकण्याचे टाळले. गेल्या मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून करुणानिधी यांनी स्वत:चेच नाव पुढे केले होते. राज्यात २००४ मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यावर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले होते, पण काकांनी (शरद पवार) यांनी पुतण्याची ती इच्छा तेव्हा पूर्ण होऊ दिली नव्हती.

  • अखिलेश यांच्या कारभारावरून नाराज असलेल्या शिवपाल यादव यांनी बंडाचे निशाण फडकविले होते. शिवपाल यादव यांनी पक्ष सोडल्यास समाजवादी पक्षाचे नुकसान होईल, असे मत मुलायम यांनी व्यक्त केले होते.