पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी भारतीय रेल्वेची लगीनघाई सुरू झाली आहे. देशातील पहिली रेल्वे ज्या ठाण्यापर्यंत धावली होती तेच ठाणे आता देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्याही नकाशावर आले आहे. त्यानुसार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी)- ठाणे- अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे ५०० किमीचे हे अंतर अवघ्या दीड तासात पार होणार असून त्यासाठी दीड ते दोन हजार रूपये भाडे आकारले जाणार आहे. या प्रकल्पाचा अंतरिम अहवाल रेल्वेने राज्य सरकारलाही सादर केला असून येत्या ७ ऑगस्ट रोजी त्यावर राज्य सरकार चर्चा करणार आहे. देशात हायस्पीड- बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा २००८च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई- अहमदाबाद  मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याबाबतचा वित्तीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी राईट कन्सलटंट आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी(जायका) यांच्यावर सोपविण्यात आली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच पुन्हा एकदा बुलेट ट्रेनला गती मिळाली असून नुकत्याच जाहीर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पातही याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आपल्या कार्यकालातच हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्धार मोदी सरकारने केला असून त्यानुसार रेल्वे मंत्रालयाची लगीनघाई सुरू झाली आहे. या प्रकल्पाचा अंतरिम अहवाल नुकताच रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारलाही सादर करण्यात आला आहे. त्यानुसार पहिली बुलेट ट्रेन मुंबई -अहमदाबाद व्हाया ठाणे अशी धावणार असून त्याचे अंतर ४९८.५ किमी असेल. प्रारंभी पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या मार्गावरूनच ही ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव होता. मात्र या मार्गावरून बुलेट ट्रेन धावू शकणार नाही, त्यासाठी स्टँडर्ड गेजची आवश्यकता असून दोन ट्रॅकची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. शिवाय पश्चिम रेल्वेवरून ही ट्रेन चालवायची झाल्यास मोठय़ा प्रमाणात बांधकामे तोडावी लागतील आणि ते अशक्य असल्याने बुलेट ट्रेनचा मार्ग बीकेसी- ठाणे- विरार- अहमदाबाद असा निश्चित करण्यात आला आहे. बीकेसी मैदानात २० मीटर भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस उभारण्यात येणार असून ते मेट्रो, मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडले जाणार आहे. आठ ते १६ डब्यांची ही ट्रेन असेल आणि तिचा वेग ताशी ३०० ते ३५० किमी असेल. यासाठी २०० किमी प्रवासाठी १ हजार तर ५०० किमीच्या प्रवासासाठी २५०० रुपयांपर्यंत भाडे असेल. या मार्गावर बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, डहाणू रोड, वापी, वलसाड, बिलीमोरिया, भरूच, आणंद आणि अहमदाबाद अशी स्थानके असतील.
ठाण्याहून पुणे-नाशिकसाठी बुलेट ट्रेन!
भविष्यात ठाणे- पुणे  आणि ठाणे- नाशिक याही मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी ठाण्याचीच निवड करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. एमएमआरडीएची जागा, आणि आवश्यक मदतीबाबत ७ ऑगस्ट रोजी मुख्य सचिवांकडे होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.