मालाड, माझगावमध्ये हवेचा दर्जा धोकादायक स्तरापर्यंत

दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली असून, गेल्या चार दिवसांत मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅन्ड वेदर फोरकास्टींग अ‍ॅन्ड रिसर्च’च्या (सफर) आकडय़ांनुसार मुंबईतील सर्वसाधारण हवेची प्रत ‘चांगली’ ते ‘अत्यंत वाईट’ या स्तरापर्यंत घसरल्याची नोंद करण्यात आली आहे. अभ्यंगस्नानाच्या दिवसापासून मुंबईतील अनेक विभागांत खालावत गेलेली हवेची गुणवत्ता पाडव्याच्या दिवशी ‘धोकादायक’ स्तरापर्यंत पोहचल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. यात प्रामुख्याने माझगाव, मालाड, बोरिवली व वांद्रे-कुर्ला संकुल या विभागांमध्ये आरोग्यास हानीकारक असलेल्या वातावरणाची नोंद झाली. शनिवारी पुन्हा हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ स्तरापर्यंत नोंदवली गेली आहे.

फटाके व प्रदूषणविरोधी जनजागृती मोहिमेकडे मुंबईकरांनी कानाडोळा केल्याचे ‘सफर’चे हवा गुणवत्ता तपासणीचे आकडे दर्शवत आहेत. मोठय़ा प्रमाणात फटाके फोडल्याने मुंबईच्या वातावरणात हवा दूषित करण्याची क्षमता अधिक असणारे ‘पीएम २.५’ व ‘पीएम १०’ या घनरुप कणांचे प्रमाण वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. हे आकडे वेळेनुरुप बदलल्याचे चित्रही दिसले आहे.

मुंबईतील ‘सफर’चे हवामान गुणवत्ता तपासणीचे निरीक्षण कक्ष पालिका आणि हवामान विभागाच्या अंतर्गत आहेत. दिवाळीच्या या दिवसांमध्ये सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या दोन्ही कालावधीत हवेची गुणवत्ता खालवल्याचे ‘एअर क्वॉलिटी इंडेक्स’ च्या निर्देशांकावरु न स्पष्ट झाले आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण इंडेक्स १७६ म्हणजे ‘समाधानकारक’ होता. लक्ष्मीपूजनच्या दिवशी २०४ ‘वाईट’ या स्तरावर व पाडव्याच्या दिवशी ३१९ म्हणजे ‘अत्यंत वाईट’ या स्तरापर्यंत हा निर्देशांक नोंदवला गेला. याशिवाय भाऊबीजेच्या दिवशी हा गुणवत्ता इंडेक्स १९० निर्देशांकापर्यत उतरला होता.

पहिल्या दोन दिवसांमध्ये माझगाव विभागाची हवेची गुणवत्ता ही ‘अत्यंत वाईट’ स्तरापर्यंत मोजण्यात आली आहे. यावेळी २३६ व ३०३ हा गुणवत्तेचा निर्देशांक ‘सफर’ने नोंदवला होता. त्याखालोखाल बारोवली, बीकेसी आणि अंधेरी भागातही हवेची प्रत ढासळली होती. पाडव्याच्या दिवशी मात्र उपनगरातील मालाड विभागात ४३६ इंडेक्स नोंदवत ‘धोकादायक’ स्तरापर्यंत प्रदूषण वाढले होते.

या वातावरणात ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला ‘सफर’च्या संकेतस्थळावर देण्यात आला होता. याशिवाय भाऊबीजेच्या दिवशी सर्वाधिक खालावलेली हवेची गुणवत्ता बोरीवली विभागात नोंदवली गेली. याठिकाणी गुणवत्तेचा निर्देशांक  २५६ नोंदवला गेला.

मुंबईत गेल्या चार दिवसांत हवेची एकूण सर्वसाधारण गुणवत्ता ‘अंत्यत वाईट’ या स्तरापर्यंत पोहोचली होती. याशिवाय काही विभागांमध्ये ‘धोकादायक’ स्तरापर्यत गुणवत्ता खालावल्याने या भागात श्वसनाचे त्रास असणाऱ्या व्यक्तींनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आम्ही संकेतस्थळाद्वारे दिला होता. शनिवारी मुंबईत कमी प्रदूषण नोंदवल्याने मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ स्तरापर्यंत राहण्याची शक्यता आहे.

– डॉ. गुफरान बेग, संचालक-सफर