* मुंबईतील उपनगरांसह नवी मुंबईत हवेचा दर्जा खालावला * वाढत्या प्रदूषणाने अभ्यासक बुचकळय़ात

मुंबईतील वायुप्रदूषणाच्या पातळीत गेल्या १०-१५ दिवसांपूर्वी सुरू झालेली वाढ थांबण्याचे नाव घेत नसून दररोज वायुप्रदूषणाचा निर्देशांक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र शासनाच्या ‘सफर’ उपक्रमांतर्गत देशातील प्रमुख महानगरांच्या वायुप्रदूषणाचा निर्देशांक दररोज जाहीर केला जातो. यात मंगळवारी मुंबईचा आकडा हा तब्बल ३१० म्हणजे अत्यंत वाईट या पातळीपर्यंत पोहचला होता. यात अंधेरी, चेंबूर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी, माझगाव, कुलाबा, नवी मुंबई या उपनगरांतील हवेचा दर्जा हा मोठय़ा प्रमाणात ढासळला असून येथील नागरिकांना श्वसनाचे विकार होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.

[jwplayer SsOh4X07]

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या दर्जात मोठे चढ-उतार होत असून यात हवेचा दर्जा ढासळत असल्याचीच उदाहरणे जास्त दिसून आली आहेत. हिवाळ्याच्या काळात समुद्रातून शहराकडे वाहणारे वारे पडल्याने शहरात हवेचे प्रदूषण जास्त होत असल्याचे तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले होते. वारे न वाहिल्याने शहरात निर्माण झालेली प्रदूषित हवा वातावरणातच राहिल्याने हे प्रदूषण होत होते. मात्र, सध्या अशी परिस्थिती नसून समुद्राकडून वारे शहराच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे सध्या शहरात होणाऱ्या प्रदूषणाचे नेमके काय कारण आहे. याबाबत तज्ज्ञांनाही ठोस उत्तर देता आलेले नाही.

हवेत प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या जड मूलद्रव्यांचे प्रमाण (पर्टिक्युलेट मॅटर) वाढल्याने प्रदूषणात वाढ होते. सफर उपक्रमांतर्गत या वाढलेल्या प्रदूषणाचा निर्देशांक दररोज प्रसारित करण्यात येतो. मुंबईत मंगळवारी हा निर्देशांक वाढल्याचे दिसून आले. हा निर्देशांक ३१० म्हणजेच अत्यंत वाईट अवस्थेत पोहचला होता. यामुळे अस्थमा व श्वसनाचे विकार असलेल्यांनी घराबाहेर पडल्यास त्यांना त्रास होण्याची भीतीही सफर उपक्रमाने व्यक्त केली होती. तसेच, सामान्य नागरिकांनाही श्वसनाचे त्रास सतावतील असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच, उपनगरांची अवस्थादेखील अत्यंत वाईट असून ही परिस्थिती कायम राहिल्यास मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका उत्पन्न होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबईत गेल्या १५ दिवसांपासून हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसते आहे. याची नेमकी कारणे उघड होत नसून नागरिकांच्या आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, सध्या हवा व्यवस्थित वाहत असतानाही हे प्रदूषण वातावरणात दिसत आहे. त्यामुळे याचे नेमके कारण काय आहे हे सध्या सांगता येणार नाही.

– डॉ. गुरफान बेग, संचालक, सफर

[jwplayer KxgDFb6T]