मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीच्या घटनांमध्ये विमानतळावरच स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचाच सहभाग असल्याची बाब हवाई गुप्तचर विभागाच्या कारवाईत रविवारी उघड झाली. दुबई येथून आलेल्या एका प्रवाशाकडील ५२ लाख किमतीचे सोने संबंधित सफाई कंपनीच्या माणसाला देताना या प्रवाशाला हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी एकूण तीन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबई विमानतळावर हल्ली आखाती देशांतून दिवसाआड बेकायदा मार्गाने आणलेले कोटय़वधींचे सोने पकडले जात आहे. रविवारी दुबई येथून आलेल्या एका प्रवाशाकडील सोने हस्तगत करताना हवाई गुप्तचर विभागाला या सोने तस्करीमागील एका सूत्रधाराचा शोध लागला. मोहम्मद अश्रफ मेलपारंबा अमू (वय २९) हा प्रवासी रविवारी दुबई येथून एमिरेट्सच्या ईके – ५०६ क्रमांकाच्या विमानाने मुंबईत दाखल झाला. विमानातून बाहेर पडत या प्रवाशाने थेट प्रसाधनगृहात प्रवेश केला. त्याच्या संशयित हालचालींमुळे हवाई गुप्तचर विभागाचे एक पथक त्याच्या

मागावर होते. या प्रवाशाने दोन पुडक्यांमध्ये आणलेली प्रत्येकी १० तोळे वजनाची ८ सोन्याची बिस्किटे एका स्टिलच्या कचऱ्याच्या डब्ब्यात टाकली. या बिस्किटांचे वजन १ किलो ८०० ग्रॅम असून त्याची किंमत ५६ लाख आहे.

कचऱ्याच्या डब्यात त्याने ही बिस्किटे टाकल्यावर या पथकाने त्याला लगेचच ताब्यात घेतले नाही. त्या ऐवजी त्याच्यावर पाळत ठेवली. दुसरीकडे प्रसाधनगृहावरही लक्ष ठेवले. थोडय़ा वेळातच तेथे मे. सिला सोल्यूशन्स या विमानतळावर स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंपनीचा आकाश मगर (२५) हा सफाई कर्मचारी पोहोचला. त्याने प्रसाधनगृहाची चाचपणी करण्यास सुरुवात केली. मात्र, तेथे गुप्तचर विभागाचे अधिकारी आल्याचे समजताच मगर याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने सांगितले की, त्याच्या कंपनीचा पर्यवेक्षक सुमित दलाल (२७) याला तो हे सोने देणार होता. अधिकाऱ्यांनी तात्काळ दलाल याला ताब्यात घेत त्याचीही चौकशी केली. यावर आपण हे सोने विमानतळाबाहेर नेणार असल्याचे त्याने कबूल केले. त्यामुळे हे सोने लपवणाऱ्या दुबई येथून आलेल्या प्रवाशासह या दोघांना हवाई गुप्तचर विभागाने अटक केली आहे.