सदनिकेची ताबापत्रे देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या म्हाडाच्या वरिष्ठ लिपिकास आणि मिळकत व्यवस्थापकास लाचलुचतपत विभागाने मंगळवारी अटक केली.  या प्रकरणातील फिर्यादीच्या पत्नीला मुलुंड येथे एक सदनिका म्हाडाने स्थलांतरीत करून दिली होती. त्याचा ताबा मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे, ताबापावती आणि स्थलांतरीत आदेश देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे फिर्यादी काळाचौकी येथील म्हाडाच्या कार्यालयात गेले होते. तेथे गेल्यावर तेथील वरिष्ठ लिपिक कुरूमय्या पुजारी यांनी १ लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम ५० हजार एवढी ठरली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार  म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयात ५० हजारांची लाच घेताना मिळकत व्यवस्थापक रामकृष्ण आत्राम याला अटक करण्यात आली आणि नंतर पुजारी यालाही अटक करण्यात आली.

व्यापारी अपहरणाप्रकरणी आरोपीस दिल्लीत अटक
मुंबई : बँकॉकमध्ये एका व्यापाऱ्याचे अपहरण करून १५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी फरारी अनिल चंदर (५२) या आरोपीस मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दिल्ली विमानतळावरून अटक केली. चंदर हा कुख्यात संतोष शेट्टीचा साथीदार आहे.
२०१२मध्ये मुंबईतील एका व्यावसायिकाला ५०० कोटी रुपयांचे कर्ज कमी व्याजदरात मिळवून देण्याचे आश्वासन देत या टोळीने बँकॉकमध्ये बोलावले होते. व्यावसायिक पिता-पुत्र बँकॉकला गेल्यावर तेथे संतोष शेट्टीच्या गुंडांनी अपहरण करून १५ कोटींची खंडणी मागितली होती. १५ दिवस त्यांना एका बंगल्यात डांबून मारहाण करण्यात येत होती. मुंबईत आल्यावर पैसे देऊ, असे सांगितल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. मुंबईत त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संतोष शेट्टीला बँकॉकमध्ये अटक केली होती. अनिल चंदर हा तेव्हापासून फरारी होता. तो दिल्लीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

कल्याणच्या सेतू कार्यालयात हल्लाबोल
प्रतिनिधी, कल्याण : कल्याणच्या तहसीलदार कार्यालय व सेतू कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. या दोन्ही कार्यालयांना दलालांचा विळखा पडला असल्याने नागरिकांना दोन-दोन महिने आपले दाखले मिळत नाहीत. या घटनांवर पाळत ठेवून मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका दलालाला पकडले. त्याला चोप देऊन तहसीलदारांच्या ताब्यात दिले. कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करताच तहसील कार्यालयात खळबळ उडाली असून दलाल पळून गेले. यापुढे सेतू कार्यालयातून नागरिकांनी तातडीने त्यांचे दाखले देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

ठाण्यात तीन दरोडेखोरांना अटक
प्रतिनिधी, ठाणे : येथील बाबूभाई पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांच्या टोळीला राबोडी पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक करून त्यांच्याकडून दरोडय़ाचे साहित्य जप्त केले आहे. अभिषेक संतोषकुमार सिंग (२१), राजा त्रिलोकी जयस्वाल (१९) आणि दीपक इंद्रभूषण झा (२०), अशी या तिघांची नावे असून ते उल्हासनगर भागात राहतात. पेट्रोल पंप लुटण्यासाठी हे तिघे जण येणार असल्याची माहिती राबोडी पोलिसांना मिळाल्यानंतर राबोडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. या तिघांकडून चाकू, मिरची पूड, दोरी, प्राणघातक हत्यारे आणि एक टॅक्सी व दोन मोटारसायकल्स जप्त केल्या आहेत. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकलमधून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
प्रतिनिधी , नवी मुंबई : बेलापूर येथील एका शिपिंग इन्स्टिटय़ूटमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या चिपळूणमधील विद्यार्थ्यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. मथिन इस्माइल काजी (१८) असे या विद्यार्थ्यांचे नाव असून, या दुर्घटनेत त्याचा भाऊ मुतलिब (२१) हा गंभीर जखमी झाला आहे.
चिपळूणमधील नायशी या गावातील रहिवासी असलेले मथिन व मुतलिब हे आपल्या आई-वडिलांसोबत बेलापूरला येत होते. मंगळवारी सकाळी पनवेल स्थानकात उतरून या कुटुंबाने सीएसटीकडे जाणारी लोकल पकडली. दरवाजाजवळ उभ्या असलेल्या मथिनचा तोल गेला. त्याला पकडण्यासाठी धावलेला मुतलिबही खाली पडला. या दुर्घटनेत मथिनचा मृत्यू झाला, तर मुतलिब जखमी झाला असून, त्याला बेलापूरच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे,

पनवेलमध्ये वृद्ध महिलेची हत्या
प्रतिनिधी, नवी मुंबई : तालुक्यातील खेडूकपाडा परिसरात एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली . शकुंतला भोईर (६२) असे मृत महिलेचे नाव असून चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी रात्री त्या घरात एकाटय़ाच होत्या. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याचा सुमारास त्यांचा मुलगा राजेंद्र घरी आला असता, घरामध्ये त्या रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या. कळंबोली पोलीस ठाण्यात या घटनेची या घटनेची नोंद करण्यात आली.

मेट्रो रेल्वेमार्गात आगंतुकाची लुडबूड
प्रतिनिधी, मुंबई : रेल्वेपाठोपाठ आता मेट्रो रेल्वेलाही रेल्वेमार्गातून आगंतुकपणे  मार्गक्रमण करणाऱ्यांचा  फटका बसला आहे. मंगळवारी जागृती नगर येथे मेट्रोच्या दोन रूळांमधील जागेतून एक इसम चालत जात होता. पायलटने तात्काळ गाडी थांबवून मुख्य नियंत्रण कक्षाला त्याची माहिती दिली. सात मिनिटे ही गाडी थांबली होती. रूळ मार्ग मोकळा करेपर्यंत दोन गाडय़ा १२ मिनिटे रूळावर रखडल्या होत्या. त्यामुळे पुढच्या गाडय़ाही चार ते पाच मिनिटे उशीराने धावत होत्या. परंतु पुढच्या १५ मिनिटांत परिस्थिती पूर्वपदावर येऊन मेट्रो गाडय़ा नियमित धावू लागल्या.

कॉम्प्युटर सायन्सला पसंती
मुंबई : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या जेईई प्रवेश परीक्षेतील सर्वोत्तम १०० विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक ८४ विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्सला पसंती दिली आहे. त्या खालोखाल इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ही विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आवडीची शाखा ठरली आहे. जेईईमध्ये पहिल्या १० मध्ये असलेल्या एकमेव आदिती या विद्यार्थिनीनेही कॉम्प्युटर सायन्सला पसंती दिली असून तिने दिल्ली-आयआयटीला प्राधान्य दिले आहे, तर उर्वरित नऊ जणांनी मुंबई-आयआयटीमध्ये याच विषयाला प्रवेश घेतला आहे.यंदा १८,०६१ विद्यार्थ्यांना जेईई-अ‍ॅडव्हान्समधून आयआयटीकरिता प्रवेशपात्र ठरविण्यात आले होते. यापैकी ७३० विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. उर्वरित विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार जागावाटप यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या फेरीनंतर १६ आयआयटीतील ९,७८४ जागांपैकी ७३ जागा रिक्त राहिल्या आहेत.