भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे प्रकरण गाजत असताना नबी अहमद शेख या मुंबईकर तरुणाला पाकिस्तानमध्ये अटक झाल्याचे वृत्त रविवारी हाती आले. मात्र, त्याच्याबाबत हाती लागलेल्या माहितीमुळे या प्रकरणास नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. नबी अहमद शेख हा मुंबईत सन २००२-२००३ मध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांतील एक संशयित होता व सन २००६ मध्ये जम्मू-काश्मीरमार्गे तो पाकिस्तानात शिरला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकसत्ताला मिळाली आहे.

सन २००२-०३मध्ये मुंबईत विलेपार्ले, गेट-वे आणि झवेरी बाजार, घाटकोपर येथील बेस्ट बसथांबा, मुलुंड स्थानकात शिरणारी लोकल यात बॉम्बस्फोट झाले होते. त्या स्फोटांमध्ये सिमी (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेन्ट ऑफ इंडिया) या संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यासंदर्भातील चौकशीसाठी तपास यंत्रणांनी मुंबईतून – विशेषत: सिमीचे अस्तित्व असलेल्या भागांमधून अनेक तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी जोगेश्वरीतील तरुणांच्या चौकशीतून नबी अहमद शेखचे नाव संशयित म्हणून पुढे आले होते. तेव्हापासून सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. २००६पर्यंत शेखवर भारतीय सुरक्षा यंत्रणांची नजर होती, मात्र त्यानंतर तो गायब झाला. त्याचवर्षी जम्मू-काश्मीरमार्गे तो पाकिस्तानमध्ये शिरला, अशी माहिती हाती आली आहे.  सन २००६मध्ये दुबईत नोकरी मिळाल्याचे सांगून नबीने घर सोडले. मात्र तो प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये दाखल झाला. भारतीय दहशतवादविरोधी यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडील माहितीनुसार, सन २००६मध्येच शेख पाकिस्तानात पोहोचल्याच्या वृताला विविध यंत्रणांकडून दुजोरा मिळाला होता. घर सोडल्यानंतर शेख मुंबईत पुन्हा दिसला नाही. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबानेही जोगेश्वरी पूर्वेकडील राहते घर विकले. सध्या हे कुटुंब जोगेश्वरी पश्चिमेकडे वास्तव्यास असल्याची माहिती मिळते.

१९ मे रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादेत शेखला अटक करण्यात आली. पासपोर्टवरून तो मुंबईतील जोगेश्वरीचा रहिवासी आहे, अशी माहिती पुढे आली. मात्र पाकिस्तानात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती. येथील वास्तव्याबाबत तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. म्हणून त्याला अटक करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

अटक कशासाठी?

शेख हा पाकिस्तानमध्ये आयएसआय किंवा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून चपराक खाल्ल्यानंतर भारतावर कुरघोडी करण्यासाठी शेखला पुढे करून भारताविरुद्ध कांगावा करण्याची चाल पाकिस्तान खेळण्याची शक्यता आहे, असे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात येते.