आर.जे. मलिष्का आणि शिवसेना यांच्यात झालेल्या वादात आता मुंबईतल्या एनजीओनं उडी घेतली आहे. शनिवारी सकाळी मुंबईत मलिष्काला पाठिंबा देण्यासाठी एक रॅली काढण्यात आली, एवढंच नाही तर रस्त्यावर असलेल्या पोलिसांना बामही भेट देण्यात आला. मुंबईत पाऊस सुरू झाला की रस्त्यावरचे खड्डे पुन्हा परततात. दरवर्षी हीच समस्या मुंबईकरांना भेडसावते.

यामुळे वाहतुकीची कोंडी होणं, अपघात होणं या सगळ्या समस्यांना मुंबईकरांना दरवर्षी तोंड द्यावं लागतं. याच सगळ्या प्रकारावर विनोदनिर्मितीच्या रूपातून भाष्य करत आर. जे. मलिष्कानं एक गाणं रचलं आहे. हे गाणं रचण्यासाठी तिनं व्हायरल होणाऱ्या ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही का?’ या गाण्याचा आधार घेतला. मलिष्कानं तयार केलेलं गाणं आणि त्याच्या ओळी लोकांच्या चांगल्याच पसंतीला उतरल्या. मात्र या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.

मागील २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. असं असूनही रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात शिवसेना सपशेल अपयशी ठरली आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतं मुंबईकरांच्या याच समस्यावर मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाही का? हे गाणं मलिष्कानं रचलं, ज्यानंतर शिवसेनेचा तिळपापड झाला. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी तर मलिष्काविरोधात ५०० कोटींचा दावाही ठोकला आहे. मात्र आता मुंबईतली एनजीओ मलिष्काच्या मदतीला धावली आहे.

‘आज तक’ या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, शनिवारी सकाळीच अंधेरीतल्या रस्त्यांवर एनजीओच्या सदस्यांनी खड्ड्यांची पाहणी केली आणि या सगळ्यांनी मलिष्काचा फोटो असलेले मास्क लावले होते. तसंच या सगळ्याच आंदोलकांनी वाहतूक पोलिसांना बाम भेट म्हणून दिले. या सगळ्यामुळे मुंबई महापालिकेचा तिळपापड झाला असला तरीही भाजपनं मलिष्काला साथ दिली आहे.

मलिष्कानं ज्या खुबीनं मुंबईकरांची समस्या लोकांच्या समोर आणली त्यासाठी तिची स्तुती करावी तेवढी थोडी आहे असं आशिष शेलार यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता मलिष्का प्रकरणावरूनही शिवसेना आणि भाजप यांच्यात सुंदोपसंदी रंगणार का? अशीही एक चर्चा रंगताना दिसते आहे.