मुंबईतील ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांना अखेर दिवाळीचा बोनस मिळणार आहे. महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना यंदा साडेपाच हजार रुपयांचा बोनस मिळणार असून यामुळे बेस्टमधील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १४, ५०० रुपयांचा बोनस जाहीर झाला असला तरी ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नव्हता. ‘बेस्ट’ची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने बोनस देता येणार नाही, अशी भूमिका बेस्ट प्रशासनाने घेतली होती. बेस्ट उपक्रमाचा तोटा ९०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून मासिक वेतनासाठीही कर्ज घ्यावे लागते, असे प्रशासनाचे म्हणणे होते. बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात कृती समितीच्या नेत्यांनी २१ ऑक्टोबररोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. ऐन भाऊबीजेच्या दिवशी ‘बेस्ट’चे कर्मचारी संपावर गेल्यास शहरातील बससेवा ठप्प पडण्याची शक्यता होती. गेल्या तीन वर्षांत बेस्टला ६८, ८५ आणि २४२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून ठाणे, पुणे आणि एसटी महामंडळानेही कर्मचाऱ्यांना बोनस दिला. मग बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस का नाही, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत होते.

बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी ‘बेस्ट’ उपक्रमाला उचल देण्याची तयारी दर्शवली. यानुसार बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला. बोनस जाहीर होताच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी भाऊबाजीला होणारा नियोजित संप मागे घेतला.