महागाईविरोधात मुंबईतील रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, अशा शब्दात त्यांनी सेनेच्या आंदोलनाचा समाचार घेतला.

शिवसेनेने भाजप सरकारविरोधात आक्रमक होत आंदोलनाचे रणशिंग फुकले असून शनिवारी शिवसेनेने मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने केली. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आदी नेतेमंडळी आंदोलनात सहभागी झाली होती. नही चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन’, ‘बहुत हुई पेट्रोल- डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा घोषणा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिल्या.

शिवसेनेच्या आंदोलनावर आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला. जे मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवरही बसले तेच आज मोदींच्या विरोधात घोषणा देतात. ज्या माणसाच्या जिवंतपणी मृत्यूच्या घोषणा दिल्या जातात तो दिर्घायुषी होतो असे म्हणतात. पण नवरात्रीत ‘शिमगा’ करणाऱ्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे, असे आशिष शेलार यांनी म्हटले होते. शेलार यांनी ट्विटरवरुन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही तिखट शब्दात टीका केली होती. ज्यांची एकही निवडणूक लढवण्याची औकात नाही, अशांनी माझ्यासारख्या सातत्याने लोकांमधून निवडून आलेल्या लोक प्रतिनिधीवर बोलू नये, असे शेलार यांनी सांगितले होते.

शेलार यांच्या या टीकेवर अनिल परब यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिले. ‘मातोश्री माझ्यासाठी मंदिर आहे, त्याच्या पायऱ्या धुवायची आणि चाटायची माझी तयारी आहे. महापालिकेत एका मताने का होईना आम्ही जिंकलो. आम्ही आजपर्यंत कधीही खाल्ल्या ताटात घाण केली नाही’, असे परब यांनी म्हटले आहे. ‘आशिष शेलार हे मातोश्रीच्या पायऱ्या चाटत चाटत आले आहेत. २०१४ मधील निवडणुकीपूर्वी शेलार तासनतास मातोश्रीबाहेर वाट बघत बसायचे हे विसरु नये असे परब म्हणालेत.