रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीची दाणादाण

गेल्या दोन आठवडय़ांपासून या ना त्या कारणाने वाहतूक कोंडीला सामोऱ्या जाणाऱ्या मुंबईकरांना गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने शुक्रवारी वेठीस धरले. पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी, रुंदावलेले खड्डे यांमुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गासह शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर शुक्रवारी दुपापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होती. तर रुळांवर पाणी साचल्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत झाल्याचा फटकाही मुंबईकरांना बसला.

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार शुक्रवारीही कायम राहिली. त्याचा फटका उपनगरी सेवेला तसेच रस्ते वाहतुकीला बसला. मुंबईतील सखल भागांत पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. पाणी साचल्याने अंधेरीचा सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. शहरात नऊ तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरात चार व १५ अशा एकूण २८ ठिकाणी पाणी साचले होते. गांधी मार्केट, प्रतीक्षा नगर, श्ीाव येथे पाणी साचल्यामुळे येथील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली होती. शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरात एकूण १८ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद झाली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनस्तापातही भर पडली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता. गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. धावपट्टीवर साचलेल्या पाण्याचा व कमी दृश्यमानतेचा फटका विमान वाहतुकीलाही बसला. विमाने १५ ते २० मिनिटे उशिराने उड्डाण करत होती. आताही येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी पडतील तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत आहे. २९ जुलै रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत या तलावक्षेत्रात आत्तापर्यंत पडलेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे- मोडकसागर-१२९४.२० मिलिमीटर, तानसा-१२३२.२० मिलिमीटर, विहार- २४००.४० मिलिमीटर,  तुलसी- २१४३ मिलिमीटर, अप्पर वैतरणा- १११९.२० मिलिमीटर, भातसा- १२०४ मिलिमीटर आणि मध्यवैतरणा- १२५१.९० मिलिमीटर. या संपूर्ण तलावक्षेत्रात आत्तापर्यंत एकूण ९ लाख १३ हजार २२६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी याच तारखेला तलावक्षेत्रात एकूण पडलेला पाऊस ७ लाख ४१ हजार ३४९ मिलिमीटर इतका होता.

ट्विटरवरून कोंडीला वाट

वाहतुकीचा कोंडीचा फटका बसलेल्या अनेकांनी ट्विटरवरून आपल्या मनस्तापाला वाट करून दिली. काहींनी मुंबई महापालिका प्रशासन तर काहींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोजच्या होणाऱ्या वाहतुकीला जबाबदार धरले. अंधेरीच्या विमानतळ परिसरात कशी वाहतुकीची कोंडी झाली आहे, याची ग्वाही देणाऱ्या गुगल मॅपच्या प्रतिमा, वाहतूक कोंडीची छायाचित्रे यांचा आधार घेत प्रवासी आपला मनस्ताप व्यक्त करत होते.