बोर्डिंग पास न दिल्याने ३२ प्रवाशांनी जेट एअरवेजविरोधात फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. जेट एअरवेजने चेक-इन काऊंटरवर उशिरा पोहोचल्याचे कारण देत दिल्ली – मुंबई विमानाचा बोर्डिंग पास देण्यास नकार दिला, असा आरोप या प्रवाशांनी केला आहे. यातील काही प्रवासी मुंबई महापालिकेचे कर्मचारी आहेत. विमानाने पहिल्यांदाच प्रवास करणार होतो. त्यासाठी पैसे जमवले होते. पण फसवणूक करून आणि चुकीच्या पद्धतीने विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आमचे बोर्डींग पास इतर प्रवाशांना दिले, असा आरोप त्यांनी केला आहे.

विमान तिकीट एका महिन्याआधीच आरक्षित करूनही या ३२ प्रवाशांना विमानाने प्रवास करता आले नाही. या प्रकरणी त्यांनी २४ डिसेंबर २०१६ रोजी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रवाशांनी केलेले आरोप जेट एअरवेजने फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. विमान पकडण्याआधी प्रवासी कुठे होते, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी मोबाईल फोन कंपन्यांशी संपर्क साधला आहे. तसेच सीआयएसएफकडून विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रण मागवले आहे. प्रवाशांच्या तक्रारीनुसार, ३५ प्रवाशांच्या गटाने १३ नोव्हेंबरला पावणेअकराच्या सुमारास दिल्ली-मुंबई विमानाचे तिकीट आरक्षित केले होते. विमान पकडण्यासाठी आम्ही विमानतळावर ९.५२ वाजता पोहोचलो होतो, असा प्रवाशांचा दावा आहे. मात्र, उशिरा पोहोचल्याने बोर्डिंग पास दिला नाही, असे जेट एअरवेजचे म्हणणे आहे. बराच वाद झाल्यानंतर जेटच्या कर्मचाऱ्याने तिकीटावर आरटी ९.५७ असा उल्लेख असून, त्याचदरम्यान रांगेत उभ्या असलेल्या इतर प्रवाशांना त्याच विमानाचे बोर्डिंग पास देण्यात आल्याचे सांगितले. ३५ प्रवाशांची तिकीटे ८ पीएनआरमध्ये विभागलेले होती आणि ३ तिकीटांवर सुरुवातीला आरटी ९.५७ असे लिहिलेले होते. प्रवाशांच्या समूहाच्या प्रमुख जयंती राठोड यांनी तीच तिकीटे काऊंटरवर दाखवली होती. इतर लोकांना तिकीटे देण्यात येत होती. त्यामुळे मी १०.१७ वाजता समूहातील इतर लोकांना तिकीटे दिली. त्यातील ३ जणांना बोर्डिंग पासही मिळाले होते. ते आमच्या समूहातील आहेत हे त्यांना कदाचित माहिती नव्हते. आमच्यातील चार अन्य प्रवाशांना सारखेच पीएनआर क्रमांक होता. त्यांनाही विमानात चढून दिले नाही, असे राठोड यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. जेटच्या कर्मचाऱ्यांनी त्याच विमानातून प्रवास करण्यासाठी आम्हाला नव्याने तिकीट खरेदी करण्यास सांगितले. त्याची किंमत २७३०० रुपये होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ४ महिन्यांआधी आम्ही प्रत्येक तिकीट ४८०० रुपयांना खरेदी केले होते. जेटने आम्हाला बोर्डिंग पास दिले नाहीत. अखेरच्या क्षणी तिकीट खरेदी करणाऱ्यांना तिच तिकीटे जास्त किंमतीने विकले आणि त्यांना १०.२० वाजता बोर्डिंग पास देण्यात आले. जेटवर कारवाई केली पाहिजे. त्यामुळेच आम्ही पोलिसांत तक्रार केली, असे राठोड यांनी सांगितले.