अनेक रहिवाशांकडून आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष भोवले

या इमारतीचं, आमच्या जिवाचं काही खरं नाही. तळमजल्यावर जोरात काम सुरू आहे. त्यामुळे इमारत कमकुवत बनलीये. अधूनमधून धक्के बसतात. इमारत कधीही धसू शकते, अशी भीती सिद्धिसाई इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या रंजनबेन शहा (६२) यांना गेल्या काही दिवसांपासून खात होती. घरी येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाला त्यांनी ही भीती बोलून दाखवली होती. मंगळवारी रंजनबेन यांचा अंदाज खरा ठरला, १५ खोल्यांची, चारमजली सिद्धिसाई इमारत सकाळी दहाच्या सुमारास पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली. अंदाज वर्तविणाऱ्या रंजनबेनही ढिगाऱ्याखाली कायमच्या दबल्या गेल्या.

रंजनबेन यांची नात रुत्वी (१४) ढिगाऱ्याखाली बेपत्ता आहे. तिचा संध्याकाळी उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. प्रीतेश, आतीश ही दोन मुले, रुपा व धर्मिष्ठा या दोन सुना, रुत्वी, लब्धी आणि ध्रुव या तीन नातवंडांसह रंजनबेन इमारतीत वास्तव्यास होत्या. लब्धी, ध्रुव सकाळी शाळेत गेल्याने त्यांना अपघाताचा पत्ताच नव्हता. मोठा मुलगा आतीश अपघाताच्या काही मिनिटांआधी घरातून बाहेर पडला. मी वीज बिल भरले आणि श्रेयस चौकापर्यंत पोहोचतो न पोहोचतो तोच फोनवर फोन सुरू झाले. तुझी इमारत कोसळली आहे, तू कुठे आहेस, अशी विचारणा करणारा शेजारील इमारतीतील मित्राचा फोन आला आणि मी तसाच माघारी फिरलो. इमारतीच्या आवारात आलो आणि पायाखालची जमीन सरकली. दहा मिनिटांपूर्वी उभी इमारत पूर्णपणे खचली होती. समोर फक्त ढिगारा होता. इमारतीतून सुखरूप बाहेर पडलेल्यांचा आणि तळमजल्यावर काम करणाऱ्या मजुरांचा कालवा ऐकू येत होता, असे आतीश सांगत होते. आई, भाऊ प्रीतेश, वहिनी, पत्नी आणि पुतणी हे घरीच होते. त्यांचे काय झाले असेल हा विचारही करवत नव्हता. बचावकार्य सुरू झाले आणि काही वेळाने भाऊ, पत्नी, वहिनी यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र आई तग धरू शकली नाही. पुतणी रुत्वी नववीत शिकते. परीक्षा असल्याने तिने आज सुटी घेतली होती. ती शाळेत गेली असती तर खूप बरे झाले असते, हे सांगताना आतीश यांना हुंदका अनावर झाला. जखमी प्रीतेश यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी भूकंपात घरे थरथरतात तसा धक्का बसला होता. तीनेक महिन्यांपासून तळमजल्यावरील शितप रुग्णालयात मोठय़ा प्रमाणावर नूतनीकरण सुरू होते. आम्हाला माहिती मिळाली होती की, जागामालक सुनील शितप तळमजल्यावरील इमारतीचे सर्व खांब तोडून मोकळी जागा तयार करत आहेत. मुळात तळमजल्यावरील तीन खोल्यांमध्ये अनेक वष्रे रुग्णालय सुरू होते. शितपची परिसरात दहशत आहे. पोलीस, पालिका अधिकारी सर्वाची शितपशी हातमिळवणी आहे. तक्रार करून काहीही फायदा नव्हता हे आम्हाला माहीत होते.

चौकशी समिती

दुर्घटनेच्या ठिकाणी आयुक्त अजोय मेहता यांनी भेट देऊन माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे आणि अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पचे प्रभारी संचालक विनोद चिठोरे यांनी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्यास आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले.

कोण आहे सुनील शितप ?

सुनील शितप हे शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत. शितप यांच्या पत्नीने महानगरपालिकेच्या फेब्रुवारीतील निवडणूक प्रभाग क्रमांक १२६ मधून लढवली होती. या प्रभागातून मनसेच्या उमेदवार निवडून आल्या.

रस्ते वाहतूक वळवली : घाटकोपरचा एलबीएस रोड हा कायम वर्दळीचा रस्ता. पूर्व उपनगरांसह ठाण्याला जोडणाऱ्या या रस्त्यालगत असलेली इमारत कोसळल्याने या रस्त्यावरील उत्तर दिशेची वाहतूक थांबवण्यात आली.  त्यामुळे संपूर्ण दिवस या रस्त्यावर वाहतूक कोंडी होती.

अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

  • ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची सुटका करताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. त्यातील एकाला राजावाडी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.
  • ढिगाऱ्याखाली दबलेल्या सिलेंडरमधून वायुगळती झाल्याने दुसऱ्या जवानाला श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला. त्यांना जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मूळ रचनेत बदल केल्याने झालेल्या दुर्घटना

  • १९ जुलै २००७ – बोरिवली पश्चिम येथील २० वर्षे जुनी असलेली सातमजली लक्ष्मीछाया पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ८० हून अधिक माणसे अडकली होती. यापैकी ३० जणांचा मृत्यू झाला व १५ जखमी झाले. तळमजल्यावर भिंत पाडून दोन दुकानांची जागा एकत्र करण्याच्या प्रयत्नांमध्ये इमारतीच्या मूळ सांगाडय़ालाच धक्का बसला होता.
  • १० जून २०१३ – माहीम दग्र्याजवळील अल्ताफ मंजिल ही पाचमजली इमारत पावसाच्या पहिल्यात फटक्यात कोसळली. या दुर्घटनेत दहा जण मृत्यूमुखी पडले. पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्याचे इमारतीमधील रहिवाशांचे म्हणणे होते. तळमजल्यावरील कार शोरूमसाठी इमारतीच्या मूळ रचनेत बदल केले होते.
  • २७ सप्टेंबर २०१३ – डॉकयार्ड येथील महापालिकेच्या बाजार विभागाची बाबू गेनू मंडई इमारत कोसळून ६१ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले. इमारतीचा तळमजला भाडय़ाने घेतलेल्या व्यक्तीने गोदामासाठी जागा वाढवण्यासाठी इमारतीच्या खांब तोडला आणि ही इमारत कोसळली. या प्रकरणी पालिकेच्या सात अधिकारी निलंबित झाले.

नव्या घरात जाण्यासाठीची धडपड थांबली

इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहाणारे अजमेरा कुटुंबही अपघातात उद्ध्वस्त झाले. शेअर व्यवसाय करणारे पारस अजमेरा यांनी एलबीएस मार्गावरील खारावाडी परिसरात नवा फ्लॅट विकत घेतला होता. गृहप्रवेशाआधी डागडुजी, नूतनीकरण जवळपास पूर्ण झाले होते. पुढल्या आठवडय़ाभरात सिद्धिसाई सोडून नव्या घरात जाण्याचा त्यांचा विचार होता. मंगळवारी सकाळी फर्निचरच्या उरलेल्या कामासाठी मसलत करण्यासाठी विद्याविहारच्या जवाहर नगरमध्ये राहणारे सुतार मन्सुखलाल गज्जर (७५) पारस यांच्याकडे आले होते. चहा घेत दोघांची चर्चा सुरू होती. इतक्यात तळमजल्यावरून ‘भागो भागो, बिल्डिंग गिर रही है, जल्द से जल्द निचे आव’, हा कालवा दोघांनी ऐकला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पत्नी दिव्या, मुलगी निराली आणि सुतार गज्जर यांना खाली उतरण्यास सांगितले. या तिघांना घराबाहेर काढून पारस जिना उतरू लागले. ते दुसऱ्या माळ्यावर पोहोचतात तोच इमारत पूर्णपणे कोसळली. त्यानंतर पारस यांचे डोळे थेट इमारतीच्या आवारातील शांतिनिकेतन रुग्णालयात उघडले. या अपघातात ते बचावले, मात्र पत्नी दिव्या आणि सुतार गज्जर यांचा मृत्यू झाला, तर सीए परीक्षेच्या तयारीसाठी एक महिना सुटी घेऊन घरी अभ्यास करणारी मुलगी निराली बेपत्ता आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे पारस यांचा मोठा मुलगा सिद्धांत सकाळीच कामावर निघून गेल्याने तो बचावला. सिद्धांतही सीए आहे. शांतिनिकेतन रुग्णालयात पारस यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी दोन्ही हात जोडले.