इमारतीतील रहिवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

निवडणुकीत ४ कोटींचा खर्च झाला आहे. तो वसूल करायचा आहे. तुम्ही माझ्या आड येऊ नका. कुठेही जा, कुठेही तक्रार करा, कोणीही माझे काहीही वाकडे करणार नाही, अशी वल्गना शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितप करत होते. सिद्धिसाई इमारतीच्या दुर्घटनेला, निष्पाप रहिवाशांच्या मृत्यूला तेच जबाबदार आहेत. इमारतीच्या तळमजल्यावरील तीन खोल्यांच्या जागेत त्यांनी आधी रुग्णालय सुरू केले. आता तेथे त्यांना बार अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट सुरू करायचे होते. त्यासाठी इमारतीच्या मूळ रचनेत त्यांनी मोठा फेरबदल केला. तोच सिद्धिसाईतल्या रहिवाशांच्या जिवावर बेतला, असा थेट आरोप रहिवासी लालचंद रामचंदानी यांनी केला.

रामचंदानी यांच्या पत्नी गीता या अपघातातून थोडक्यात बचावल्या. माझे इमारतीजवळच दुकान आहे. मी सकाळी दुकानात जाण्यासाठी इमारतीबाहेर पडलो, तेव्हा  माझीच इमारत कोसळली. हातपाय लटपटले. मी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर जमलेल्या जमावाने मला आत जाऊ दिले नाही.

अपघातातून बचावलेले ललित ठग यांनी शितप यांना फासावर लटकवा, अशी मागणी केली आहे. माझी तीन महिन्यांची मुलगी, पत्नी, आई आता परत येणार नाहीत; पण अशा पद्धतीने बेलगामपणे इमारतींच्या रचनेत बदल करू पाहणाऱ्या प्रत्येकाला जरब बसणे आवश्यक आहे. त्यासाठी शितप यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया ललित व्यक्त करतात. गेल्या महापालिका निवडणुकीत शितप यांच्या पत्नी वॉर्ड क्रमांक १२६ मधून निवडणूक लढल्या. मात्र त्या पडल्या.