शितप रुग्णालयातील जखमी वर्षां सकपाळचा प्रश्न

शितप रुग्णालयाच्या लेखा विभागात कार्यरत असलेली वर्षां सकपाळ इमारत दुर्घटनेत जखमी झाली. उपचारांनंतर दुपारी शुद्धीवर आलेली वर्षां राहून राहून तीन महिन्यांच्या रेणुकाची चौकशी करते आहे. रेणुका वाचली का, तिला काही लागलं नाही ना, ती कशी आहे, असे प्रश्न ती विचारते आहे. अपघातापूर्वी वर्षां सिद्धिसाई इमारतीत होती. इमारत कोसळत होती तेव्हा तीही बाहेर पळण्याच्या प्रयत्नात होती. इतक्यात इमारतीच्या जिन्यावरून अर्पिता ठक तीन महिन्यांच्या मुलीला उराशी कवटाळून घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत खाली उतरताना वर्षांने पाहिले. अर्पिताच्या मागे तिच्या सासू प्रमिलाही होत्या. त्यांना खाली उतरवण्याच्या प्रयत्नात अर्पिताचा जिना उतरण्याचा वेग मंदावलेला पाहून वर्षांने मदतीचा हात पुढे केला. तीन महिन्यांच्या रेणुकाला वर्षांने आपल्याकडे घेतले आणि ती बाहेर पळण्याच्या प्रयत्नात होती. इतक्यात संपूर्ण इमारत खाली कोसळली. अग्निशमन दलाने ढिगारा उपसून रेणुकाला बाहेर काढले तेव्हा ती वर्षांच्या कवेतच होती. रेणुकाच्या डोक्यावर एक जखम वगळता कुठेही जखम नाही. मात्र ढिगाऱ्याखाली गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला.

असेही नाते

पारस अजमेरा यांच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून काम करणारी मोलकरीण सुनीता म्हात्रे अपघाताची माहिती मिळताच तडक कळव्याहून घाटकोपरला आली. सुनीता गरोदर आहे. दिवस भरत आल्याने मी दोन महिन्यांपूर्वी अजमेरांकडील काम थांबवले; पण अपघाताची माहिती मिळाली आणि राहावले नाही. थेट इथे निघून आले. गेल्या रविवारी अजमेरा कुटुंबाची खुशाली जाणून घेण्यासाठी आले होते. सर्वाना भेटले. दोन दिवसांत ही हक्काची माणसं दिसणार नाहीत अशी कल्पनाही नव्हती. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सर्वच अजमेरा कुटुंब सिद्धिसाईमध्ये एकत्र आले होते. या कार्यक्रमाला सुनीताला आवर्जून आमंत्रण होते.

बचावकार्यात रहिवाशांचे मोलाचे सहकार्य

सिद्धी साई इमारत कोसळल्यानंतर अग्निशमन दल, महापालिकेने सुरू केलेल्या बचावकार्याला आसपासच्या रहिवाशांनी मोलाचे सहकार्य केले. एकीकडे वेगाने बचावकार्य सुरू होते तर दुसरीकडे शांतिनिकेतनसह आनंदीबाई प्रभू चाळ, गणेश मैदान येथून आबालवृद्ध स्वयंसेवक म्हणून पुढे आले. अपघाताची माहिती मिळताच तरुणांनी शाळा-महाविद्यालय बुडवले. कामाला निघालेले परत आले. सर्वप्रथम इमारत कोसळल्यानंतर शेजारील शांतिनिकेतन संकुलातील रहिवाशांनी संरक्षक भिंत पाडून रुग्णवाहिका जास्तीत जास्त जवळ पोहोचू शकतील, अशी व्यवस्था केली. बघ्यांची गर्दी आवरण्याची मुख्य जबाबदारी या रहिवाशांवरच होती. नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने त्यांनीच बघ्यांची गर्दी एका विशिष्ट अंतरावर रोखली. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक उभे होते. समजावून प्रसंगी दरडावून बचावकार्यात अडथळा ठरू नका, हे सांगत होते. सकाळपासून बचावकार्यात जुंपलेल्यांना चहा, नाश्ता, पाण्याची व्यवस्था याच रहिवाशांनी केली.

कोलकाता येथे नागरी प्रशासनाने धोकादायक म्हणून जाहीर केलेली जवळपास १०० वर्षांपूर्वीची एक इमारत मंगळवारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार झाल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.कोलकात्याच्या मध्यवर्ती भागातील तलतला परिसरातील १० मिरर स्ट्रीट ही इमारत कोसळली. मृतांची नांवे हिमाद्री पहार (३८) आणि हंसा साहू (२०) अशी असून त्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली मिळाले.