सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ‘आयआरसीटीसी’चा महत्त्वपूर्ण प्रकल्प

बाहेरच्या राज्यांमधून मुंबईत पर्यटनासाठी किंवा इतर कारणांसाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून रेल्वे मुंबई सेंट्रल स्थानकात अत्याधुनिक प्रतीक्षालय (एक्झिक्युटिव्ह लाउंज) उभारणार आहे. हे प्रतीक्षालय सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभे राहणार असून त्याची निविदा प्रक्रिया दोन आठवडय़ांत सुरू होणार आहे. या प्रतीक्षालयासाठी प्रवाशांकडून शुल्क घेतले जाणार आहे. या प्रतीक्षालयात प्रवाशांसाठी विविध सुविधा असतील.

उत्तरेकडून मुंबईत येणाऱ्या बहुतांश गाडय़ा पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल स्थानकात येतात. तसेच या स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गाडीच्या नियोजित वेळेच्या आधी आलेल्या प्रवाशांसाठी किंवा मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांना काही काळ विसावा मिळावा, यासाठी आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे हे अत्याधुनिक प्रतीक्षालय उभारणार आहे. हे प्रतीक्षालय संपूर्णपणे वातानुकूलित असेल. तसेच प्रतीक्षालयात वाय-फाय सुविधा, टीव्ही, वर्तमानपत्रे व मासिके आदी सुविधा असतील. प्रवाशांसाठी या प्रतीक्षालयात न्हाणीघराचीही सोय असेल. सकाळी येणाऱ्या प्रवाशांना नाश्ता, दुपारच्या प्रवाशांसाठी जेवण, संध्याकाळी येणाऱ्या प्रवाशांना चहा-नाश्ता आणि रात्रीच्या प्रवाशांसाठी जेवण, अशी सेवाही येथे पुरवण्यात येईल

मुंबई सेंट्रलवरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचसमोरील सध्याच्या रेल्वेच्या पार्सल विभागाच्या जागेत हे प्रतीक्षालय उभे राहणार आहे. १५०० चौरस फूट एवढय़ा जागेत दुमजली प्रतीक्षालय उभारण्यात येणार असून ते सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारले जाईल. मात्र त्याची देखभाल करण्याची जबाबदारी खासगी कंपनीची असेल. त्यासाठी त्या कंपनीला रेल्वेकडे ठरावीक रक्कम भरावी लागेल. तसेच हे प्रतीक्षालय वापरण्यासाठी प्रवाशांना काही रक्कम भरावी लागेल. ती रक्कम भरल्यावर प्रवाशांना हे प्रतीक्षालय तीन तासांसाठी वापरता येईल. त्यापुढे तेवढीच रक्कम भरून प्रवाशांना पुन्हा तीन तासांसाठी हे प्रतीक्षालय वापरण्याची मुभा असेल, असे आयआरसीटीसीमधील सूत्रांनी सांगितले. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रतीक्षालयासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहितीही या सूत्रांनी दिली.

‘सीएसटी’साठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

अत्याधुनिक प्रतीक्षालयांच्या यादीत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव नसल्याने आयआरसीटीसीने आता या स्थानकासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. सीएसटी येथील प्रवासी आरक्षण केंद्राच्या खालचा मजला प्रतीक्षालयासाठी वापरण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाकडून त्यासाठी मंजुरी आल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल.