केवळ २० अन्न निरीक्षक; नव्या कर्मचारी भरतीत १० निरीक्षकांचीच वाढ

मुंबईतील दोन कोटी नागरिकांची अन्न सुरक्षा ही फक्त २० अन्न निरीक्षकांवर अवलंबून आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ४० हजार लोकसंख्येमागे एक अन्न सुरक्षा निरीक्षकाची गरज असते. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे मुंबईसाठी पुरेसे अन्न सुरक्षा निरीक्षक उपलब्ध नाहीत. यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य वाऱ्यावर असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या मुंबई विभागासाठी ६५ अन्न सुरक्षा निरीक्षकांची पदे आहेत. यातील २० पदे भरण्यात आली असून ३५ पदे आजही रिक्त आहे. सध्या प्रशासनाअंतर्गत राज्यात कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू असून यात ४६ अन्न सुरक्षा निरीक्षक, १९ सहाय्यक आयुक्त आणि ३६ औषध निरीक्षकांची जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील केवळ १० अन्न सुरक्षा निरीक्षकांच्या जागा भरण्यात येतील. यामुळे मुंबईतील अन्न सुरक्षा निरीक्षकांची संख्या ३० पर्यंत पोहोचली तरी ही संख्या पूरेशी नाही.  राज्यात १८८ अन्न सुरक्षा निरीक्षकांची पदे असून यातील केवळ ८७ पदे भरण्यात आली आहेत. १९७२ साली अन्न व औषध प्रशासनाची स्थापना करण्यात आली तेव्हाच्या लोकसंख्येला अनुसरुन केलेल्या पदांमध्ये वाढ करण्यात आली नाही.

मुंबईत पावसाळा सुरू होण्यापूर्वी भेसळयुक्त बर्फावर कारवाई करण्यात आली होती. सध्या पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी उपहारगृहे व खाद्यपदार्थाच्या विक्रेत्यांवर नियमावली लावण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे कारवाई करण्यास अडथळा निर्माण होतो. अन्न निरीक्षकांना ठिकठिकाणी फिरुन नमूने गोळा करावे लागतात आणि तो नमूना लॅबला देण्यापासून आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे काम यांना करावे लागते. मात्र मुंबईसारखी मोठी लोकसंख्या असलेल्या शहरात २० अन्न सुरक्षा निरीक्षक अपूरे आहेत, असे अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अन्नाबाबत ठिकठिकाणी होणारी अस्वस्छता रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. अन्न विभागात लवकरच भरती केली जाणार आहे. यामुळे सध्याच्या निरीक्षकांना बरेच सहकार्य होईल, असे अन्न व औषध प्रशासनातील अन्न विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपूरे यांनी सांगितले.

केंद्राकडून आठ कोटी मंजूर

केंद्राकडून राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून राज्यातील प्रयोगशाळांना अत्याधुनिक उपकरणे देण्यात येणार आहेत. सध्या राज्यात ११ प्रयोगशाळा असून यातील केवळ मुंबई व पुण्यातील प्रयोगशाळा अत्याधुनिक आहेत; मात्र केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होणार आहेत. दरम्यान अन्न निरीक्षकांची संख्या कमी असणे खरोखरच गंभीर बाब आहे. यावर लवकरच तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत या वेळी आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.