महाभूकंपाने हादरलेल्या नेपाळमधील बाधित नागरिकांसाठी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीतर्फे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मदतफेरी काढण्यात आली होती. या मदतफेरीला नागरिकांकडून सढळहस्ते मदत करण्यात येत होती. नागरिकांकडून कपडे आणि अन्य वस्तूंची मदतही देण्यात येत होती. परंतु केवळ आर्थिक मदत स्वीकारण्यात येत होती.
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीतर्फे  २० ठिकाणी मदतफेरी काढली होती. काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी आमदार आपले एक महिन्याचे निवृत्तिवेतन, तर आमदार आणि नगरसेवक आपले एक महिन्याचे वेतन नेपाळमधील भूकंपग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत. गोळा होणारी आणि जनतेकडून मिळालेली रक्कम मिळून मोठी आर्थिक मदत नेपाळमधील भूकंपग्रस्तांना देण्यात येईल, असे मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.