थंड डोक्यानेच हत्या; सिद्धांतच्या हल्ल्यात आईच्या शरीरावर १२ गंभीर जखमा

जोधपूरहून अटक केलेल्या सिद्धांत गणोरेच्या (२१) मनात आई म्हणजेच दीपाली गणोरेंबद्दल इतकी खदखद होती की त्याने त्यांच्यावर धारदार चाकूने तब्बल बारा वार केले. सिद्धांतने अत्यंत शांत डोक्याने, हत्येच्याच इराद्याने हेतुपुरस्सर दीपाली यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती शुक्रवारी वाकोला पोलिसांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाला दिली. जन्मदात्या आईच्या हत्येमागील हेतूसह पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी सिद्धांतला जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणीही पोलिसांनी केली. हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करीत दंडाधिकारी जी. आर. तौर यांनी सिद्धांतला २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले.

गुरुवारी जोधपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मला आईच्या हत्येचा पश्चात्ताप नाही, अशी प्रतिक्रिया सिद्धांतने व्यक्त केली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतरही सिद्धांतच्या चेहऱ्यावर किंचितही पश्चात्ताप, भीतीची छटा दिसली नाही. सुमारे दहा मिनिटे चाललेल्या सुनावणीत तो अत्यंत निर्वकिार होता. वाकोला पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार दीपाली यांच्या मानेवर धारदार हत्याराने भोसकल्याच्या पाच खोलवर जखमा आहेत. हातांवर चार तर डाव्या खांद्यावर तीन जखमा आढळल्या. त्यामुळे हत्येच्याच इराद्याने सिद्धांतने हल्ला केला, हे स्पष्ट होते. त्यामुळे सिद्धांतने का व कोणत्या परिस्थितीत दीपाली यांच्यावर हल्ला केला, जन्मदात्या आईच्या मानेवर सुरा चालवणे त्याला कसे शक्य झाले ही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती असून ती मिळवायची आहे. ज्या चाकूने हत्या करण्यात आली तो हस्तगत केलेला आहे. त्यावरील रक्त, हाताच्या ठशांची तपासणी होणे बाकी आहे. दीपाली यांच्या मृतदेहाशेजारी रक्ताने लिहिलेला टायर्ड ऑफ हर.. हा इंग्रजीतील संदेश सिद्धांतनेच लिहिला आहे का, ते रक्त कोणाचे याचीही शहानिशा करायची आहे.

शुक्रवारी मुंबईत आणल्यानंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी सिद्धांतकडे चौकशी सुरू केली. संपूर्ण घटनाक्रम कसा घडला याबाबत पोलीस सिद्धांतकडे कसून चौकशी करीत आहेत. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार दीपाली यांची संशयी, स्वकेंद्रित वृत्ती, आक्रमक व माझेच खरे, मीच बरोबर असा स्वभाव या हत्याकांडाच्या मुळाशी असल्याची माहिती सिद्धांतने उघड केली आहे. अभ्यासावरून सततचे टोमणे, आरडाओरड होतीच पण आईने माझ्यावर अनेक बंधने लादली होती. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व अन्य समाजमाध्यमांवरून मला बेदखल होण्यास तिने भाग पाडले. मी कोणासोबत बोलतो, किती वेळ बोलतो याच्यावरही तिची नजर असे. ती नेहमी माझा फोन चाळे, अशी माहिती सिद्धांतने पोलिसांना दिल्याचे समजते. त्यासोबत इंजिनीयिरगहून विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर सिद्धांतने परीक्षा दिली नव्हती. हत्येआधी याच विषयावरून दीपाली भडकल्या. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची घडली आणि त्याची अखेर दीपाली यांच्या हत्येत झाली, अशी माहिती समोर येते आहे. वडील खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्याशीही दीपाली यांचे वरचेवर किरकोळ कारणांवरून खटके उडत. त्याचाही परिणाम सिद्धांतच्या मनावर झाला होता. सिद्धांतचा ज्ञानेश्वर यांच्याकडील ओढा, दोघांमधील मित्रत्वाचे नाते दीपाली यांना पटत नव्हते, अशीही माहिती समोर येते आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात सिद्धांतला अटक करण्यापेक्षा त्याला सुखरूप ताब्यात घेणे जास्त महत्त्वाचे होते. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. ज्ञानेश्वर अद्याप नाशिकमधील आपल्या गावी असून त्यांनी या तपासात संपूर्ण सहकार्याची तयारी दाखवली आहे. अटकेच्या दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी सिद्धांतला कसे पकडले, तो जोधपूरला आहे याची माहिती कशी मिळाली, हा प्रश्न टाळला.