आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिद्धांत गणोरे या २१ वर्षीय तरुणाकडून तपासाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासोबत त्याच्या सुरक्षेचे आव्हान वाकोला पोलिसांसमोर आहे. गेले तीन दिवस पोलीस कोठडीत असलेला सिद्धांत शांत, अबोल, निर्विकार आहे. विचारलेल्या प्रश्नांची हो किंवा नाही या एकाच शब्दात उत्तरे देणाऱ्या सिद्धांतवर लक्ष ठेवण्यासाठी वाकोला पोलिसांनी विशेष मनुष्यबळ जोडून दिल्याचे समजते.

सिद्धांत खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांचा चिरंजीव. गेल्या आठवडय़ात गणोरे यांच्या पत्नी दीपाली यांची सांताक्रूज येथील राहत्या घरी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी सिद्धांतला जोधपूरहून अटक केली गेली. न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. सिद्धांत सध्या वांद्रे पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद आहे. अन्य आरोपींप्रमाणे त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले जाते. चौकशी संपली की पुन्हा लॉकअपमध्ये बंद केले जाते. गेल्या तीन दिवसांमध्ये वाकोला पोलिसांनी हत्या, हत्येचा हेतू, हत्येआधी घडलेल्या घटना जाणून घेण्यासाठी सिद्धांतकडे बरीच चौकशी केली. मात्र प्रत्येक प्रश्नाला हो किंवा नाही अशा एखाद-दुसऱ्या शब्दात सिद्धांतने उत्तर दिल्याचे समजते. अभ्यासावरून सततचे टोमणे, संशयी वृत्ती, वर्चस्व गाजवणारा स्वभाव यामुळे आईचा खूप राग येत होता. तिच्यापासून सुटका व्हावी असे नेहमी वाटत होते, अशी माहिती सिद्धांतने तपासात दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धांत कोठडीत निर्विकारपणे वावरतो. त्याच्या चेहेऱ्यावर कोणताही भाव दिसत नाही. त्याच्या मनात काय चालले आहे, पुढल्या क्षणी तो काय करेल याचा ठाव लागत नाही. त्यामुळे पोलीस कोठडीत त्याच्यावर करडी नजर ठेवली जात आहे. सिद्धांतकडे येत्या काळात मानसोपचारतज्ज्ञ, ओळखीतले पोलीस अधिकारी यांच्याकडून चौकशी होईल, असे संकेत आहेत.