पत्नीचा मृत्यू, तर पतीची प्रकृती चिंताजनक

नागपाडय़ाच्या बच्चूभाई कम्पाऊंडमध्ये भाडय़ाच्या खोलीत राहणाऱ्या दळवी दाम्पत्यावर मंगळवारी दुपारी घरात शिरून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात समीरा दळवी (४०) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती जुल्फीकार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपाडा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांवर धारदार शस्त्रांनी असंख्य वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी हत्या, हत्येचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दळवी दाम्पत्य मूळचे गुहागरचे आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होते. जुल्फीकार हे कुलाबा येथील दिल्ली दरबार या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. दुपारी बाराच्या सुमारास जुल्फी यांचा भाऊ घरी आला तेव्हा दरवाजा किंचित उघडा होता. आत आल्यावर त्याने जुल्फी, समीरा यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. भावाने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच समीरा यांचा मृत्यू झाला होता.

पूर्ववैमनस्य किंवा चोरी या उद्देशाने गुन्हा घडला असावा, असा संशय आहे. तसेच जुल्फीकार याचे त्याच्या पत्नीशी पटत नसल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टिकोनातून तपास करत आहोत. जखमी जुल्फीकार यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याने फार माहिती मिळू शकलेली नाही.

तूर्तास दळवी दाम्पत्याच्या नातेवाईकांकडे, शेजाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे, असे नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवंत यांनी सांगितले. हत्येच्याच इराद्याने हा हल्ला घडला. यामागे निश्चित जुना वाद असावा. तसेच हल्लेखोर दाम्पत्याच्या ओळखीतले असावेत, असे अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.