बनावट सोन्याची नाणी व दागिने खरे असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पकडण्यात पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे.

एका महिलेसह तिघेजण सोने विक्री करण्यासाठी शुक्रवारी वांद्रे पश्चिम येथील ग्लोबस सिनेमाजवळ येणार असल्याचे गुन्हे शाखेतील साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना समजले. पोलिसांनी येथे सापळा रचून बनावट सोने घेऊन आलेल्या या तिघांना ताब्यात घेतले.

या वेळी त्यांच्याकडे ६ हजार ३४५ ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची पुरातन भासावीत अशी नाणी व पिवळ्या धातूच्या माळा आढळल्या. या माळा व नाणी सोन्याच्या असल्याचे भासवून हे तिघे नागरिकांना फसवत असत. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले शिवकुमार राठोड (३३), सोनूकुमार प्रजापती (२६), दालूदेवी प्रजापती (४२)  हे तिघेही उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी १८ गुन्ह्य़ांची कबुली दिली असून हे गुन्हे मुंबईतील ओशिवरा, मरिन ड्राइव्ह यांसह ठाण्याच्या हद्दीतील मानपाडा तसेच कानपूर, लखनौ, अलाहाबाद, दिल्ली या राज्यातही घडले आहेत.

पोलीस उपायुक्त शशिकांत सातव आणि साहाय्यक पोलीस आयुक्त विनय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.

 

मद्याच्या मापात खोट करणारे आता रडारवर!

मुंबई : कुठल्याही रेस्तराँ आणि बारमध्ये मद्यपान करण्यासाठी गेल्यानंतर तुम्हाला वितरित केल्या जाणाऱ्या मद्याच्या मापात खोट असल्यास त्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. मद्याच्या मापात खोट करणाऱ्यांना आता वैधमापन विभागाने लक्ष्य केले आहे. प्रमाणित मापके न वापरणे हा वैधमापन कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतो, असे वैधमापन विभागाचे संचालक व अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवडय़ात गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली हाजीअली येथील प्रतिष्ठित अशा नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियाला लक्ष्य करण्यात आले. या ठिकाणी असलेल्या बारमध्ये मद्यमापके प्रमाणित नसल्याचे आढळून आले तर विकण्यासाठी ज्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत त्याच्या कमाल किंमतीपेक्षा जादा शुल्क घेतले जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी वैध मापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले. मद्याच्या मापात खोट आढळल्यास ग्राहकांनी वैध मापन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.