अमरावती, औरंगाबाद, नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त; अहवालातील निष्कर्ष

लोकसंख्येच्या मानाने राज्याच्या तुलनेत मुंबईत दरवर्षी सर्वाधिक गुन्हय़ांची नोंद होते. त्यावरून मुंबई असुरक्षित, मुंबई पोलीस अकार्यक्षम, अशी टीका व आरोप होतात. प्रत्यक्षात लोकसंख्येच्या तुलनेत घडणाऱ्या गुन्हय़ांचे प्रमाण काढल्यास(एक लाख लोकसंख्येमागील) अमरावती, औरंगाबाद, नागपूर या शहरांमधली गुन्हेगारी मुंबईपेक्षा जास्त असल्याचे दिसते. विशेष म्हणजे हत्या, बलात्कार, दरोडा, दंगल, जाळपोळ या व अशा हिंसक गुन्हेगारीतही मुंबई अन्य शहरांमागे उभी दिसते. हिंसक गुन्हेगारीत ठाणे शहर राज्यात सर्वात संवेदनशील ठरते. ठाण्यानंतर औरंगाबाद, नागपूर, नवी मुंबई, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सोलापूर आणि नंतर मुंबईचा क्रमांक लागतो.

PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
Navneet Ranas campaign office destroyed due to gusty winds
वादळवारं सुटलं गो… सोसाट्याच्‍या वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त
bacchu kadu, Ramtek,
बच्चू कडूंचा महायुतीवर अमरावतीनंतर रामटेकमध्येही ‘प्रहार’
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने २०१५ साली राज्यात घडलेल्या एकूण गुन्हय़ांचा अहवाल तयार केला. सोबत निष्कर्ष आणि निरीक्षणेही नोंदवली होती. त्यानुसार राज्यातल्या हिंसक गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले. २०१५मध्ये राज्यात एकूण ४२३१८० गुन्हय़ांची नोंद झाली. त्यापैकी २७५४१ गुन्हे भारतीय दंड संहितेतील विविध कलमांन्वये तर १४७७६६ गुन्हे विविध स्थानिक व विशेष कायद्यान्वये नोंद झाले. राज्यातील एकूण गुन्हय़ांचे प्रमाण दर लाख लोकसंख्येमागे ३५५ इतके होते. भादंवितील गुन्हय़ांचे प्रमाण २३१ तर स्थानिक व विशेष कायद्यानुसार नोंद गुन्हय़ांचे प्रमाण १२४ इतके होते. २०१५ मध्ये मुंबईत भादंविनुसार ४२९४० गुन्हे नोंद झाले. दर एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईच्या गुन्हय़ांचे प्रमाण ३४० इतके होते. अमरावती शहरात ४४८८ इतक्याच गुन्हय़ांची नोंद झाली. पण लोकसंख्येनुसार इथल्या गुन्हय़ांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक ५२२ भरले. त्यानुसार औरंगाबाद शहराचे गुन्हे प्रमाण  ४४० इतके भरले.

  • मुंबईत जास्त गुन्हय़ांची नोंद आहे. पण प्रमाण अन्य शहरांपेक्षा कमी, अशी माहिती महासंचालक कार्यालयातून ‘लोकसत्ता’ला मिळाली.
  • हिंसक गुन्हेगारीत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने हत्या, हत्येचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हुंडाबळी, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, दंगल आणि जाळपोळ असे गुन्हेप्रकार एकत्र करून हिंसक गुन्हेगारी असा स्वतंत्र घटक तयार केला आणि त्याचा अभ्यास केला. या घटकातही मुंबईत सर्वाधिक ४९०७ गुन्हे नोंद आहेत. मात्र गुन्हे प्रमाणात मुंबई आठव्या क्रमांकावर आहे.
  • गुन्हे किती दाखल झाले, गुन्हय़ांचे प्रमाण काय यापेक्षा घडलेल्या प्रत्येक गुन्हय़ाची नोंद पोलीस ठाण्यात होणे महत्त्वाचे आहे.
  • कदाचित त्यामुळे नोंद गुन्हय़ांचा, गुन्हे प्रमाणाचा आकडा फुगू शकेल. पण प्रत्येक नोंद गुन्हय़ाचा तपास होईल. तथ्यता असल्यास आरोपी गजाआड होतील. अचूकपणे पुराव्यांची मालिका न्यायालयात मांडल्यास त्यांना शिक्षा होईल. परिणामी भविष्यात गुन्हे कमी घडतील.
  • बलात्कार, विनयभंग, अश्लील शेरेबाजी, पाठलाग असे गुन्हे पूर्वी नोंद होत नसत. किंवा त्याचे प्रमाण कमी होते. पण या प्रकारातला प्रत्येक गुन्हा नोंद व्हावा, यासाठी जनजागृती करण्यात आली. तसे पोषक वातावरण तयार केले.
  • ऑनलाइन गुन्हा नोंद व्हावा यासाठी यंत्रणा उभारण्यात आली. त्यामुळे महिलांविरोधातील गुन्हे जास्तीतजास्त समोर येऊ लागले. नोंद होऊ लागले.
  • सोनसाखळी चोरी या गंभीर गुन्हे प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईसोबत प्रत्येक ठिकाणी, गल्लीबोळात, रस्त्यावर पोलिसांचे अस्तित्व ठेवण्यात आले. परिणामी गेल्या वर्षी सोनसाखळी चोरी निम्म्याने घटली, अशी माहिती दीक्षित देतात.