सात जणांना वीस वष्रे सश्रम तुरुंगवास

मुलुंडमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची तर उर्वरित सात आरोपींना वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तक्रारदार महिलेने दिलेला थेट पुरावा, मुलुंड पोलिसांनी अचूक तपास करीत गोळा केलेल्या भक्कम परिस्थितिजन्य पुराव्याचा आधार घेत सत्र न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला.

सप्टेंबर २०१३ मुलुंड पश्चिमेकडे हा गुन्हा घडला होता. जळगावहून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेली मध्यमवयीन महिला कचरा वेचून उदरनिर्वाह करीत असे. काम आटोपून रस्त्याकडेला मिळेल तिथे ती पथारी पसरायची. घटनेच्या दिवशी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये ही महिला झोपली होती. मध्यरात्री सहा तरुणांच्या जमावाने तिचे अपहरण करून निर्जनस्थळी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकारानंतर या महिलेवर अन्य तीन आरोपींनी पुन्हा अत्याचार केले. आरोपींचे अत्याचार बलात्कारापर्यंत थांबले नाहीत. आरोपींनी या महिलेला अमानुषपणे शारीरिक जखमाही दिल्या. या घटनेनंतर मुलुंड पोलिसांनी वेगाने तपास करीत गुन्हय़ातील ८ आरोपींना अटक केली.

[jwplayer eVujQYoF]

या गुन्हय़ातील मुख्य आरोपी विशाल सूद याला घटनेच्या नऊ महिन्यांनंतर अटक करण्यात आली. सूद आणि अत्याचारित महिला एकमेकांना ओळखत होते. या गुन्हय़ाचा कट सूदनेच आखला होता, असे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सूद हा पंजाब व नंतर राजस्थानमध्ये दडून बसला होता. मात्र गाठीचे पैसे संपल्याने तो पुन्हा मुंबईत आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेडय़ा ठोकल्या.

ओळख परेडमध्ये अत्याचारित महिलेने सर्वच आरोपींना ओळखले. सर्वच आरोपी तक्रारीनुसार नेमक्या ठिकाणी होते हे त्यांच्या मोबाइल लोकेशनवरून स्पष्ट झाले. तसेच लगेच अटक झालेल्या काही आरोपींचे डीएनए नमुनेही जुळले.

या भक्कम पुराव्यांआधारे सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी सूद आणि वाहिद कय्यूम खान ऊर्फ कालू या दोघांना जन्मठेप ठोठावली. तर अजय गेचंद, महेश मर्गज, वसीम शेख, दस्तगीर खान, मनप्रीतसिंग गिल, भूवन हमाल, धीरज पांचाळ ऊर्फ वीरू या सात आरोपींना वीस वर्षे सक्तमजुरी ठोठावली. तसेच सर्व आरोपींना न्यायालयाने  २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

[jwplayer gNVa0pFP]