माझ्या विरोधकाला गाडी का दिली, या रागातून प्रभागातील विकासकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना नगरसेवक शशिकांत पातकर यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना बदलापुरात घडली आहे.

दिवसाढवळ्या भरचौकात झालेल्या हाणामारीची शहरात मोठी चर्चा रंगली होती. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे अधिक तपास करीत आहेत.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे वार्ड क्र. २७चे नगरसेवक शशिकांत पातकर यांनी त्यांची फॉच्र्युनर गाडी जयेश राऊत यास कोकणात जाण्यासाठी दिली होती. त्याचा राग आल्याने समीर पाटील व आशीष काजळे यांनी पातकर यांना गांधी चौकात शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी समीर पाटील याने चाकूसारख्या धारदार शस्त्राने केलेला वार चुकविताना पातकर यांच्या उजव्या कोपऱ्यास चाकू लागून जखम झाली आहे.

कांदिवली येथील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कांदिवली येथील एका २५ वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ उकलले असून याप्रकरणी झारखंड येथून त्यांनी एका युवकास अटक केली आहे. याप्रकरणातील प्रमुख आरोपी हा महिलेचा पती असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रेल्वे पोलिसांना गेल्या महिन्यातील १४ तारखेला एका अनोळखी महिलेचा मृतदेह बोरिवली व कांदिवली स्थानकांदरम्यान आढळला होता. याबाबत पुढील तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता. पुढील तपासात तिचे नाव प्रियांका दिनेश वर्मा (२५) असून ती कांदिवली येथील बिहार टेकडी, कांदिवली (पू.) येथे राहणारी असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, ती आपल्या झारखंड येथील गावी पती व आठ वर्षांच्या मुलीसह काही दिवसांपूर्वी गेली होती. झारखंड येथील त्यांच्या घराची माहिती घेऊन पोलिसांनी हजारीबाग, झारखंड येथून गौतमकुमार गुप्ता (२१) या युवकास ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यावर त्याने कबुल केले की त्याने प्रियांका हीचा पती दिनेश याला तीला मारण्यात मदत केली होती.