मार्च महिन्याचा पूर्वार्ध नेहमीपेक्षा काहीसा आल्हाददायक गेला असला तरी अखेरच्या आठवडय़ात पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. त्याची पहिली झलक शनिवारी पाहायला मिळाली. सांताक्रूझ येथे ३४.६ अंश से तर कुलाबा येथे ३२ अंश से. कमाल तापमान राहिले. कमाल तापमानातील वाढ टोकाची नसली तरी पश्चिमेकडून येत असलेल्या वाऱ्यांसोबत येत असलेल्या बाष्पामुळे घामाच्या धारांमध्ये वाढ झाली.

डिसेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या महिन्यानंतर येत असलेला मार्च हा उष्णतेचा महिना म्हणूनच ओळखला जातो. मार्च महिन्यात कमाल तापमान ४० अंश से. पर्यंत पोहोचण्याचा विक्रम दर वर्षांआड होतो. मात्र यावेळचा मार्च महिना गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आल्हाददायक राहिला आहे. आतापर्यंत कमाल तापमान ३५ अंश से.च्या आतच राहिल्याने उन्हाच्या झळा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. मात्र मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने नोंदवला आहे. त्याची सुरुवात शनिवारपासून झाली. सांताक्रूझ व कुलाबा या दोन्ही ठिकाणच्या कमाल तापमानात आधीच्या दिवसापेक्षा दोन अंश से.ने वाढ झाली. कमाल तापमान ३५ अंश. से खाली असले तरी हवेत आद्र्रतेचे प्रमाण अधिक होते. संध्याकाळी साडेपाच वाजताही कुलाबा येथे सापेक्ष आद्र्रतेचे प्रमाण ७४ टक्के होते. त्याच्या परिणामस्वरूपात उकाडय़ात वाढ झाली.

गेले काही महिने वाऱ्याची दिशा उत्तर किंवा वायव्येकडून होती. आता पश्चिम दिशेने वारे येण्यास सुरुवात झाली आहे. समुद्रावरून येत असलेले हे वारे सोबत भरपूर बाष्प आणतात. त्यामुळे हवेतील आद्र्रतेत वाढ होत असून त्यामुळे वास्तविक तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत आहे, असे हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

झळा उन्हाळय़ाच्या

  • पारा चढण्यास सुरुवात
  • गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदाचा मार्च महिना आल्हाददायक
  • पुढील आठवडय़ात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज