नोकरदारांना नित्यनियमाने दुपारच्या भोजनाचा डबा कार्यालयात वेळेवर पोहोचविणारे डबेवाले येत्या १ ते ६ एप्रिल या काळात सुट्टीवर जाणार आहेत. आपल्या गावी कुलदैवतांच्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांनी ही सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आठवडाभर नोकरदारांना दुपारच्या भोजनाची व्यवस्था करावी लागणार आहे.
मुंबईतील नोकरदारांना डबे पोहचविणारे बहुतांश डबेवाले मूळचे मुळशी, मावळ, राजगुरूनगर, आंबेगाव, जुन्नर, पुणे, अकोला, संगमनेर, अहमदनगर येथील आहेत. या गावांमध्ये १ ते ६ एप्रिल या काळामध्ये कुलदैवतांच्या यात्रा भरत असल्याने डबेवाले पुढील आठवडय़ात आपापल्या गावी जाणार आहेत. त्यामुळे यादरम्यान नोकरदारांना डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे, असे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने स्पष्ट केले आहे.
१ ते ६ एप्रिलच्या काळात महावीर जयंती, गुड फ्रायडे, साप्ताहिक सुट्टी येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तीन दिवसच डबे पोहचविण्याची सेवा देता येणे शक्य नाही. मंगळवारी ७ एप्रिलला मात्र डबे पोहोचते करण्याची सेवा पूर्ववत सुरू होईल, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.