‘मी पहिल्यांदाच मुंबईत आले आहे, आतापर्यंत ‘गेटवे ऑफ इंडिया’ फक्त सिनेमात पाहिला होता’ , गडचिरोलीतील ऐटापल्ली या दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमिता मुंबईची भव्यता पाहून भारावून गेली होती. एरवी गडचिरोलीतील पावसाळ्याचे रूप हे भीषण असते. या दिवसात वाहतुक, वीज बंद होते. मात्र मुंबईतील पावसाळा हा सुखावणारा आणि आनंद देणारा होता. गडचिरोलीहून आलेल्या या मुलांना गेट वे ऑफ इंडियाबरोबरच मुंबईतला हा सुखावणारा पाऊसही पहिल्यांदाच अनुभवता आला.

राज्य सरकार २०१३ पासून ‘आपले महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहली’च्या निमित्तान नक्षलग्रस्त भागातील मुलांना मुंबई, पुणे या शहरी भागांमध्ये सहलींचे आयोजन करते आहे. गडचिरोलीतील अतिदुर्गम आणि नक्षलवादी भागात राहणाऱ्या मुलांना महाराष्ट्राची माहिती व्हावी या उद्देशाने ही सहल आयोजित केली जात आहे. आतापर्यंत १३ सहलींचे आयोजन करण्यात आले असून १०५३ मुलांना मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील प्रेक्षणिय स्थळांचे दर्शन घडविले आहे. नुकतीच ही मुले मुंबईत येऊन गेली. सध्या ती पुण्यात शनिवारवाडा, पर्वती या प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटत आहेत.

मुंबईत महालक्ष्मी, सिद्धीविनायक मंदिर, संजय गांधी उद्यान, गेटवे ऑफ इंडिया, गोरेगाव फिल्मसिटी स्टुडिओ, तारोपोरवाला मत्सालय, जुहू चौपाटी, मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, नेहरू तारांगण, ताज हॉटेल, मलबार हिल, एलिफंटा लेणी, हॅंगिंग गार्डन या ठिकाणी मुलांना नेण्यात आले. अतिदुर्गम भागातील मुलांना लोकल, उंची इमारती, हॉटेल, मोठे रस्ते पाहण्याची संधी मिळाली नाही. या मुलांना नागपूर शहरात जाणेही शक्य होत नाही. त्यामुळे मुंबई, पुणे येथे ही मुले शांतपणे शहराचे भव्य रूप डोळ्यात साठवित होती. शहराचे हे भव्य रूप डोळ्यात साठवून आपल्या घरी परतल्यावर शेजारी, आई-वडील, मित्र-मैत्रिणी यांना भरभरून आलेले अनुभव सांगतात. गडचिरोलीतील कोरची, भामरागड, ऐटापल्ली येथील शाळातील आणि आश्रमशाळातील मुलांना मुंबई-पुणे-औरंगाबाद-नागपूर दर्शनासाठी नेण्यात येते.

दुर्गम भागात राहत असल्यामुळे शहरातील बदल आणि विकासाची माहिती त्यांना मिळत नाही. मात्र तरूणांना राज्यातील तंत्रज्ञान आणि आर्थिक बदलाची माहिती व्हावी यासाठी ही सहल आयोजित केली जाते, असे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर मेधे यांनी सांगितले.