मुंबईच्या २०१४-३४ या कालावधीतील विकास आराखडय़ावर शुक्रवारी अखेरच्या दिवशी तब्बल १५ हजार सूचना आणि हरकती पालिकेकडे सादर झाल्या आहेत. गेल्या ६० दिवसांमध्ये  पालिका कार्यालयात सुमारे ५० हजारांहून अधिक सूचना आणि हरकती दाखल झाल्या.
नव्या विकास आराखडय़ात सुधारणा करून तो चार महिन्यांत सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने पालिकेला दिले असून आता या सूचना आणि हरकती विचारात घेऊनच पालिकेला विकास आराखडय़ामध्ये सुधारणा करावी लागणार आहे.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मुंबईचा नवा विकास आराखडा महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे फेब्रुवारीमध्ये सादर केला होता. त्यानंतर हा विकास आराखडा प्रकाशित करून त्यावर जनतेकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. सूचना आणि हरकतींमध्ये ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत शुक्रवारी संपुष्टात आली.
गुरुवारी सायंकाळपर्यंत ३५ हजार सूचना आणि हरकती सादर झाल्या होत्या. शुक्रवारी अखेरच्या दिवशी तब्बल १५ हजार सूचना आणि हरकती सादर करण्यात आल्या. या सूचना आणि हरकती आता विकास आराखडा फेरविचार समितीकडे सादर करण्यात येणार आहेत.
सूचना आणि हरकती विभागवार वेगळ्या करण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर या सूचना आणि हरकतींचा विभागवार विचार करण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने
सांगितले.