मुंबईतल्या गणेशोत्सवावर यंदा ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. विसर्जन ठिकाणांवरील सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी ड्रोनची मदत घेतली  जाणार आहे. तसेच सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी तब्बल १४ हजार सशस्त्र पोलिसांची फौज रस्यावर गस्त घालणार आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतूक विभागाच्या सहपोलिस आयुक्तांनी गणेशोत्सवा दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेची माहिती दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर असेल असे त्यांनी म्हटले आहे. विसर्जनाच्या मार्गावर वॉच टॉवर उभारले जाणार आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आधीच लावण्यात आले असून मुख्य नियंत्रण कक्षातून या कॅमे-यांद्वारे नजर ठेवता येईल असे अधिका-यांनी स्पष्ट केले.
गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात समन्वय घडवून सुरक्षा व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वाधिक गर्दी होणा-या गणेश मंडळांजवळ बॅरिकेड्स लावले जातील असे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावे यासाठी २५ हजार पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरून पहारा ठेवणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुंबईतील ४९ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तर ५५ रस्त्यांवरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरु राहणार आहे. याशिवाय १८ रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. याशिवाय ९९ रस्त्यांवरील पार्किंग गणेशोत्सवादरम्यान बंद राहणार आहे.