मुंबईच्या कुलाबा परिसरातील मेट्रो हाऊस या इमारतीला गुरूवारी दुपारी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामन दलाला यश आले आहे. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामन दलाने ही आग विझविली. मात्र, मध्यंतरी पाण्याच्या कमतरतेमुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी हतबल झाले होते. पाणी नसल्यामुळे त्यांच्याकडे जळत्या इमारतीकडे पाहण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यामुळे रात्री आठ वाजताच्या सुमारास आग पुन्हा एकदा भडकली होती.  यामध्ये इमारतीचा शेवटचा संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या इमारतीमधील जिने लाकडी असल्याने ते आगीत जळून गेले आहेत. त्यामुळे अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवताना अडचणी येत होत्या. गेल्या सहा तासांपासून घटनास्थळावर अग्निशामन दलाच्या १५ गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होत्या. दरम्यान, आग विझवताना निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे आता भाजप आमदार राज पुरोहित यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या आगीत अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

कुलाब्याच्या रिगल चित्रपटगृहाजवळ असणाऱ्या या चारमजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर असणाऱ्या व्हीनस हॉटेलमध्ये ही आग लागली होती. आज दुपारी ४.३० च्या सुमारास ही आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशामन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवायला सुरूवात केली. मात्र, परिसर अत्यंत वर्दळीचा असल्याने अग्निशामन दलाला आग विझविण्यात अडथळे येत होते. ही आग शॉकसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीचे स्वरूप भीषण असून परिसरात मोठ्याप्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरले आहे. या इमारतीच्या खालच्या मजल्यांवर कॅफे मोंडेगार आणि मॅकडोनाल्डची दालने आहेत. या दालनांमध्ये असणाऱ्या गॅस सिलिंडर्समुळे आगीचा धोका आणखी वाढला आहे.

सध्या पोलिसांकडून इमारतीचा परिसर खाली करण्यात येत असून या भागातील वाहतूकही अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे. या परिसरात लिओपोल्ड कॅफे आणि ताज हॉटेलसारखी अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे असल्यामुळे याठिकाणी परदेशी पर्यटकांचीही वर्दळ असते.