सोसायटीच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचा पुढाकार

प्रतिदिन १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ा, हॉटेल्स, मॉल्स आदींना स्वत:ची खतनिर्मिती यंत्रणा उभी करता यावी म्हणून पालिकेनेच आता प्रयत्न सुरू केले आहेत. कचऱ्यापासून खत, ऊर्जानिर्मिती करण्याची यंत्रणा पुरविणाऱ्या देशभरातील सुमारे १०० कंपन्यांचे १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत मुंबईत प्रदर्शन भरविण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. या कंपन्यांना गृहनिर्माण सोसायटय़ा, हॉटेल्स, मॉल्सच्या दारापर्यंत पोहोचवून कचराभूमीत जाणाऱ्या कचऱ्याचा भार हलका करण्याचा पालिकेचा मानस आहे.

दररोज १०० किलो कचरा निर्माण होत असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ा, बडी हॉटेल्स, मॉल्स आदींनी खतनिर्मिती प्रकल्प उभारून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी असा फतवा पालिकेने काढला आहे. इतकेच नव्हे तर या सोसायटय़ा, हॉटेल्स, मॉल्सचा ओला कचरा २ ऑक्टोबरपासून उचलायचा नाही, असा निर्धारही पालिकेने केला आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत.

कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा कांगावा सोसायटय़ांमधील रहिवाशांनी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर तोडगा म्हणून पालिकेने खतनिर्मितीसाठी यंत्रणा राबविणारे, तसेच यंत्रसामग्रीचा पुरवठा करणाऱ्या देशभरातील तब्बल १०० कंपन्यांचे प्रदर्शन वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केले आहे. आतापर्यंत ६० ते ७० कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभागी होण्याची तयारीही दर्शविली आहे.

सोसायटय़ांना ओल्या कचऱ्यापासून खत अथवा वीजनिर्मिती करता यावी यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आणि प्रख्यात चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योगक्षेत्रातील अग्रणी रतन टाटा यांच्या मुख्य उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा पालिकेचा मानस आहे.

कचऱ्याचा प्रश्न

  • मुंबईमध्ये सुमारे ५० हजारांहून अधिक गृहनिर्माण सोसायटय़ा आहेत. यापैकी काही सोसायटय़ांमध्ये दररोज १०० किलोहून अधिक कचरा निर्माण होतो.
  • पालिकेने २ ऑक्टोबरपासून या सोसायटय़ांमधील केवळ सुका कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सोसायटय़ांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत:लाच लावावी लागणार आहे.
  • कचऱ्यापासून खतनिर्मितीबाबत अनभिज्ञ असल्याची पळवाट सोसायटय़ांचे पदाधिकारी, हॉटेल- मॉल मालकांना काढण्याची संधी मिळू नये म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन पालिकेकडून करण्यात येत आहे.