मुंबईतील रेल्वेमार्ग आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचे जलसंवर्धन केल्यास कोयना धरणाच्या ६० टक्के म्हणजेच सुमारे ६० टीएमसी पाणी जमा होऊ शकते. त्यातून मुंबईकरांची वर्षभराची गरज भागवता येईल, असे जलसंवर्धन व कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी शुक्रवारी ‘दि बॉम्बे ग्रीनवे’ प्रकल्पाच्या सादरीकरणावेळी सांगितले. रेल्वेमार्ग परिसरातील पावसाळी पाण्याचे संवर्धन आणि रेल्वेमार्गालगत हरितपट्टा विकसित करण्याचे महत्त्व सांगणाऱ्या ‘दि बॉम्बे ग्रीनवे’ या प्रकल्पाचे सादरीकरण ‘जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’मध्ये करण्यात आले. व्हिएन्ना येथे २०१३मध्ये झालेल्या ‘इंटरनॅशनल अर्बन प्लॅनिंग अॅण्ड अर्बन डिझाईन कॉम्पिटीशन’मध्ये हा प्रकल्प पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. मुळीक आणि वास्तुविशारद अब्राहम जॉन यांनी प्रकल्पाची संकल्पना उलगडून सांगितली.
‘दि बॉम्बे ग्रीनवे’ प्रकल्प राबवला गेला तर खऱ्या अर्थाने रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी ठरणार आहे. या प्रकल्पात रेल्वेच्या ट्रॅकवर वॉक-वे बनविण्याची योजना आहे. तसेच, या योजनेत रेल्वे परिसरात पडणाऱ्या पावसाचे संवर्धन करण्याचीही कल्पना आहे.