हार्बर मार्गाच्या प्रवाशांना एसी लोकल मिळणार असली तरी त्यांचा प्रवास मात्र बाउन्सरच्या देखरेखीखाली होणार आहे. वातानुकूलित लोकल (एसी)मध्ये चढउतार करताना प्रवाशांचा गोंधळ टळावा यासाठी बाउन्सर नेमण्याची योजना आहे. मेट्रो सेवेप्रमाणेच प्लॅटफॉर्मवर प्रत्येक डब्याजवळ याप्रकारे बाउन्सर नेमण्याची ही योजना आहे.
मुंबईतील लोकल मार्गावर प्रथमच एसी लोकल चालवली जाणार आहे. या लोकलमध्ये मोनो-मेट्रोप्रमाणे स्वयंचलित पद्धतीने दरवाजे बंद होणार आहेत. साधारण २० ते २५ सेकंदात या बारा डब्यांच्या एसी लोकलचे सगळे डबे बंद होणे अपेक्षित आहे. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी रेटारेटी आणि गोंधळ पाहता, प्रवाशांना नियंत्रित करण्यासाठी बाउन्सर नेमण्याची संकल्पना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रि. सुनीलकुमार सूद यांनी मांडली आहे.