मुंबई-गोवा जलवाहतूक सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांची निवड करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन उद्योग व बंदरे विकास मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.
विधान परिषदेत उद्योग व बंदरे विकास विभागाच्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा झाली. त्यावेळी सुभाष चव्हाण यांनी पूर्वीप्रमाणेच मुंबई-गोवा बोट वाहतूक सुरू करावी, अशी कोकणवासियांची मागणी आहे, असे सांगितले. पर्यटनाच्या दृष्टीनेही जलवाहतूक सुरू करणे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे सरकारने त्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली होती. इतर काही सदस्यांनीही मुंबई-गोवा जलवाहतूक सुरू करावी, अशा मागण्या केल्या होत्या. त्यावर मुंबई-गोवा जलवाहतूक सुरू करण्याची सरकारची तयारी आहे. त्याबाबत लवकरच निविदा काढली जाईल, असे नारायण राणे यांनी सांगितले. त्याचबरोबर बंदरांसाठी जमीन घेऊन विहित मुदतीत ज्यांनी बंदरे बांधली नाहीत, त्यांच्याकडून जमिनी परत घेतल्या जातील, असे राणे यांनी जाहीर केले.

कोयनेचे पाणी मुंबईला
कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी वापरून झालेले ६७ टीएमसी पाणी कोकणातून समुद्रात सोडले जाते. एवढय़ा प्रचंड मोठय़ा प्रमाणावर वाया जाणारे पाणी मुंबईत आण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली. मुंबई शहर, उपनगर, तसेच ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्य़ात पिण्यासाठी व सिंचनासाठी या पाण्याचा वापर करण्याचा विचार आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी दोन कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. मंत्रिमंडळ पायाभूत समितीसमोर लवकरच हा प्रस्ताव मांडून त्याला मान्यता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.