सफाळे रेल्वे स्थानकालगत सिमेंट स्लीपर्स बदलण्याच्या कामात झालेल्या विलंबामुळे मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गुजरातला जाणारी रेल्वे वाहतूक दीड तास उशिराने सुरु आहे. याचा फटका बोईसर, डहाणू, वापी, उंबरगाव भागात जाणाऱ्या कामगार वर्गाला बसला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व एक्स्प्रेस गाड्यांना डहाणू ते विरारपर्यंतच्या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक दीड तास उशिराने सुरु असताना गुजरातहून मुंबईला येणाऱ्या रेल्वे गाड्या तासभर उशिराने धावत आहेत.

लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असताना मुंबईत लोकलचाही खोळंबा झाला. चेंबूर आणि टिळकनगर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. याचा फटका कामावर जात असलेल्या लोकांना बसला. रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप भोगावा लागला.