महिनाभर आल्हाददायक थंड हवा अनुभवल्यानंतर अखेरच्या दिवशी उन्हाचे चटके खाण्याची वेळ मुंबईकरांवर आली. पहाटे व दुपारच्या तापमानातही सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचा हा परिणाम होता. पुढील आठवडाभरही तापमापकातील पारा उध्र्व दिशेलाच जाणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्याचसोबत हा थंडीचा शेवट नसल्याचेही हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले.
गुलाबी थंडी काही दिवसांसाठी रजा घेणार असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. शनिवारी सांताक्रूझ येथे २०.६ अंश से. तर कुलाबा येथे २२ अंश से. किमान तापमान नोंदवले गेले. गेला महिनाभर पहाटेचे किमान तापमान १५ अंश से. दरम्यान राहिले होते. शनिवारी दुपारी तापमापकातील पाऱ्याने आणखीन उसळी घेतली. सांताक्रूझ येथे ३४.३ अंश से. नोंद झाली. या महिन्यातील हे सर्वाधिक तापमान होते. महत्त्वाचे म्हणजे तापमानातील हा बदल आणखी आठवडाभर राहणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने नोंदवला आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान ३४ अंश से. तर किमान तापमान २० अंश से. दरम्यान राहणार आहे. या काळात हवा कोरडी असल्याने घामाचा त्रास फारसा जाणवणार नसला तरी थंडीचा आल्हाददायक गारवा गायब होईल.
उत्तरेतील थंडीची लाट ओसरली असल्याने तेथून येणारे वारेही तुलनेने कमी थंड आहेत. त्याचाच परिणामस्वरूप मुंबईसह कोकण किनारपट्टीतील तापमानात वाढ झाली आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याची माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी दिली.