उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयांना आदेश

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका राज्यातील विविध कारागृहात बंदिस्त असलेल्या कच्च्या कैद्यांनाही बसत आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केला असतानाही त्यासाठी आवश्यक रकमेचीही जुळवाजुळव करूनही पाचशे-हजार रुपयांच्या नोटा न्यायालयांकडून स्वीकारल्या जात नसल्यामुळे अशा शेकडो कच्च्या कैद्यांना नाहक कारागृहात राहणे भाग पडत आहे. याची गंभीर दखल घेत जामिनाच्या रोख रक्कम ही ‘डिमांड ड्राफ्ट’, धनादेश वा ‘ई-पेमेंट’च्या माध्यमातून स्वीकारण्याचे आदेश राज्यातील सगळ्या कनिष्ठ न्यायालयांना उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर या नोटा स्वीकारू नये, असे रिझव्‍‌र्ह बँकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे जामिनाची रक्कम भरण्यासाठी आलेल्या आरोपीच्या वकिलांना परत कनिष्ठ न्यायालयांतील संबंधित विभागाकडून परत पाठवले जाते. परिणामी जामीन मिळून आणि जामिनाची रक्कम हाती असूनही कच्च्या कैद्यांना कारागृहात राहणे भाग पडत आहे. आरोपी म्हणून त्यांच्या स्वातंत्र्यावर ही गदा आहे. म्हणूनच जामिनाची रक्कम डिमांड ड्राफ्ट’,धनादेश वा ‘ई-पेमेंट’च्या माध्यमातून स्वीकारण्याचे आदेश राज्यातील सगळ्या कनिष्ठ न्यायालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च न्यायालयाचे महानिबंधक मंगेश पाटील यांनी दिली. दररोज पाच ते सहा आरोपींचे वकील जामीन मिळाल्याबाबत न्यायालयाची प्रत घेऊन लेखापाल विभागात जामिनाची रक्कम जमा करतात. त्यानंतर कारागृह प्रशासनाशी संपर्क साधून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आरोपीची सुटका होते.

बँकेतून पैसे न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर : नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनकल्लोळाचा भयानक फटका नागरिकांना सहन करता येईनासे झाले आहे. यातच शासनाच्या घोषणेनुसार स्वत:च्या घरातील विवाह सोहळ्यासाठी स्वत:च्या खात्यातून अडीच लाखांची रक्कम मागायला गेले असता बँकेने चलनच नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे रक्कम मिळत नसल्याने विवाह कसा उरकायचा, या विवंचनेतून आत्महत्या करू पाहणाऱ्या एका  व्यक्तीला गावक ऱ्यांनी वाचविले. अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे हा प्रकार घडला.

हबीब इब्राहिम मकानदार (रा. हैद्रा. ता. अक्कलकोट) यांचे बँंक खाते नागणसूर येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकेच्या शाखेत आहे. त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा ठरला आहे. त्यासाठी मकानदार हे जिल्हा बँक शाखेत गेले. परंतु रक्कम न मिळाल्याने ते कमालीचे वैफल्यग्रस्त झाले. रक्कम बँंकेत शिल्लक असूनही त्यातील अडीच लाखाची रक्कम काढता येईना म्हणून मुलीचा विवाह कसा करायचा, या विवंचनेतूनच मकानदार होते. दरम्यान शाखा व्यवस्थापकांनी मकानदार याांना २४ हजारांची रक्कम दिली.

 

निवृत्तीवेतनधारकांचे हाल

मुंबई : वेतनाचे पैसे काढण्यासाठी नोकरदारांनी बँकांमध्ये रांगा लावल्या असतानाच निवृत्तीवेतनधारकांचीही पंचाईत झाली आहे. महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात वेतन घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांकासाठी बँकांनी वेगळ्या रांगेची सोय केली असली तरी पगारदारांच्या रांगेपेक्षा हीच रांग मोठी झाल्याने अनेक ज्येष्ठांना हात हलवत घरी परतावे लागले.

महिन्याच्या पहिल्या सात दिवसात बँका व टपाल कार्यालयात ज्येष्ठ व्यक्तींची गर्दी अधिक दिसते. मात्र यावेळी बँकांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी पगारदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी निवृत्तीवेतनाची रक्कम काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठांचे हाल झाले. गेल्या महिन्यात कमी गर्दी असलेल्या बँकेतून रोख रक्कम बदलून आणली होती. मात्र आता खाते असलेल्या बँकेतूनच पैसे काढायचे असल्याने महाराष्ट्र बँकेत गेलो होतो. मात्र पगारदारांच्या लांबचलांब रांगा बघून परत आलो, गेले २० दिवस रांगा कमीच होत नसल्याने पुढील तीन चार दिवसात त्या कमी होतील, असेही वाटत नाही, असे चारकोप येथील ज्येष्ठ नागरिक शिवराम कदम यांनी सांगितले.

खर्चाला थोडे पैसे शिल्लक असल्याने पगारदारांच्या गर्दीत जाण्यापेक्षा थोडी वाट पाहायची ठरवली आहे, असे दादर येथील जयंत कुंटे म्हणाले.