गेल्या सहा वर्षांपासून मुंबईत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी दाम्पत्याची रविवारी अखेर मायदेशी पाठवणी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या दाम्पत्याला पाकिस्तानात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

सय्यद वसीम उर रहमान आणि त्यांची पत्नी साईमा दोघेही पाकिस्तानी नागरिक असून ऑक्टोबर २०१० पासून ते भारतात वास्तव्याला होते. दहा दिवसांत मायदेशी परतण्याची हमी देऊनही हे दाम्पत्य अद्यापि मुंबईतच आहे आणि केंद्र सरकारकडूनही त्यांना पाकिस्तानात पाठवण्यासाठी काहीही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत, ही बाब उघडकीस आल्यावर या दाम्पत्याने २८ फेब्रुवारीपर्यंत मायदेशी परतावे, अन्यथा त्यांनी या तारखेला अवमान कारवाईसाठी न्यायालयात हजर व्हावे, असे आदेश न्यायालयाने चार दिवसांपूर्वी दिले होते. त्याच वेळी या दाम्पत्याला मायदेशी परत पाठवण्यासाठी काहीच न करणाऱ्या केंद्र सरकारच्या भूमिकेवरही न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत त्याबाबत खुलासा मागवला होता.

न्यायालयाच्या या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर या दाम्पत्याला पुन्हा एकदा भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. शिवाय रविवारी त्यांना विमानाने पाकिस्तानला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील अपर्णा वटकर यांनी दिली. २८ फेब्रुवारी रोजी प्रकरणाची सुनावणी असून त्या वेळी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला या दाम्पत्याला पाकिस्तानात पाठवण्याचा अहवाल सादर करायचा आहे. शिवाय आधीच्या आदेशाची अंमलबजावणी न करण्यामागील खुलासाही केंद्र सरकारला करायचा आहे.  दहा दिवसांत मायदेशी परतण्याची सुरुवातीला हमी देणाऱ्या या दाम्पत्याने दिलासा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते; परंतु तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडल्यावर त्यांनी पुन्हा  उच्च न्यायालयात धाव घेत मायदेशी परतण्यासाठी चार आठवडय़ांची मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.