कोरडय़ा हवेत चाळिशी पार केलेले मुंबईतील तापमान गुरुवारी बाष्पयुक्त हवेमुळे पटकन पाच अंशांनी खाली उतरले. मात्र त्याचवेळी किमान तापमानही २७ अंशांपर्यंत पोहोचले असल्याने सकाळपासूनच घामाघूम होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसही वातावरण अंशत ढगाळ राहणार असून, पावसाच्या तुरळक सरी येण्याचा अंदाज आहे.
गेल्या दशकभरातील मार्चमधील सर्वाधिक कमाल तापमानातील दुसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची बुधवारी नोंद झाली. ४०.८ अंश से.वरून तापमान आणखी पुढे जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच गुरुवारी तापमान पाच अंशांनी खाली उतरले. कुलाबा येथे ३२.८ अंश से., तर सांताक्रूझ येथे ३४.३ अंश से. तापमानाची नोंद झाली.
बुधवारी पूर्व दिशेने जमिनीवरून आलेल्या वेगवान कोरडय़ा वाऱ्यांमुळे पारा वर गेला होता. गुरुवारी मात्र पश्चिमेकडील समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव अधिक होता. वातावरणातील सापेक्ष आद्र्रता ८० टक्क्य़ांहून अधिक वाढल्याने उन्हाच्या चटक्यांची जागा घामाने घेतली. कमाल तापमानात घसरण झाली असली, तरी किमान तापमान मात्र मुंबईकरांची सकाळी घामाघूम करण्यास पुरेसे आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत २० अंश से. दरम्यान असलेले किमान तापमान गुरुवारी २७ अंश से.पर्यंत वाढले.
उन्हाळ्यात कमाल तापमानाकडे साऱ्यांचे लक्ष असले, तरी दिवसभराचे तापमान साधारण किती खाली येते तेदेखील महत्त्वाचे असते. किमान तापमानात वाढ झाल्याने सकाळचा आल्हाददायक गारवा गायब झाल्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान वेधशाळेने अंदाज वर्तवल्याप्रमाणे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात वातावरण अंशत ढगाळ राहिले. तळकोकणातील काही भागात तुरळक सरी पडल्या. पुढील दोन दिवसही वातावरण याच प्रकारे राहणार असून पावसाच्या काही सरी येण्याची शक्यता आहे.