दोन वर्ष सामान्यांच्या आणि प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळवलेल्या पावसाने यावर्षी मात्र पाण्याचा १०० टक्के साठा केला आहे. दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन पुढील वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जाते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांपैकी अप्पर वैतरणा व भातसा वगळता सर्व तलाव या पावसाळ्यात ओसंडून वाहिले. दरम्यान अप्पर वैतरणातील जलसाठा मात्र १०० टक्क्यांवर पोहोचला.

प्रशासकीयदृष्टय़ा सोयीचे पडावे यासाठी दरवर्षी पावसाचे चार महिने संपल्यावर म्हणजे ३० सप्टेंबर रोजी धरणातील पाणीसाठय़ाची माहिती घेऊन त्याप्रमाणे नियोजन होते. गेली दोन वर्षे नियोजनाच्या दृष्टीने कसरतीची ठरली. यावेळी मात्र पावसाने दिलासा दिला. शहराला तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, भातसा आणि विहार, तुळशी या तलावातून पाणीपुरवठा होतो. मध्य वैतरणा हा तलाव दोन वर्षांपूर्वी तयार झाला होता. मात्र उंचावरील नवा पूल बांधला न गेल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरू दिला गेला नाही. गेल्या वर्षी तलाव सज्ज होता मात्र पाऊसच पडला नाही. यावर्षी मात्र सर्व बाबी जुळून आल्या आणि मध्य वैतरणाच्या तब्बल दोन लाख दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली. त्यामुळे तलावांची एकूण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचली.

यावेळी पावसाने पहिल्यापासूनच जोर केल्याने जुलैच्या मध्यावरच तुळशी हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लहान तलाव भरून वाहू लागला. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन दिवसात इतर तलावातील पाण्याने सर्वाधिक उंची गाठली. विहार तलाव १ ऑगस्टला पहाटे एक वाजता तर मोडकसागर तलाव त्याच दिवशी रात्री साडेदहाला भरून वाहिला. त्याच मध्यरात्री अडीच वाजता तानसा तलावातील पाणी सोडावे लागले तर ३ ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजता मोडकसागरही भरून वाहिला.

भातसा हा तलाव प्रचंड असून अचानक पातळी वाढून पाणी सोडावे लागल्यास पूरस्थितीची भीती लक्षात घेऊन या धरणातील जलसाठय़ाचे नियोजन केले जाते. त्यामुळे यावेळी भातसा तांत्रिकदृष्टय़ा ओसंडून वाहिला नसला तरी त्यात क्षमतेच्या ९९.५८ टक्के पाणी साठलेले आहे. अप्पर वैतरणा तलावातही १०० टक्के पाणीसाठा आहे. सर्व जलाशयांमध्ये एकूण १४ लाख ४१ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा म्हणजेच एकूण क्षमतेच्या ९९.५८ टक्के पाणी आहे. गेल्यावर्षी याचवेळी तलावात ११ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तातडीने २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. यावेळी मात्र दिवसाला सरासरी ३७०० दशलक्ष लिटर याप्रमाणे पुढील ३९० दिवसांचा पाणीसाठा आहे.