आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि दहावीच्या परीक्षेला आज (सोमवार) सुरूवात होत असताना मध्य रेल्वे मार्गावरील चिंचपोकळी आणि भायखळा स्थानकारदम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. सीएसटीहून ठाण्याच्या दिशेने जाणा-या धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.
त्यानंतर ११.३० च्या सुमारास रेल्वेसेवा पूर्ववत झाल्या आहेत. अडकलेली गाडी इंजिन जोडून दादरच्या पुढे काढण्यात आली आहे. परंतु, अजूनही सगळ्याच स्टेशनवर ऑफीसला येणा-यांची प्रचंड गर्दी आहे.
कालच मेगाब्लॉक होता तर मेगाब्लॉकच्या दिवशी रेल्वे प्रशासन काय काम करतात? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे हाल

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला आज सुरूवात होत असून, घरापासून लांब परीक्षाकेंद्र आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहेत. परंतू मध्य रेल्वेने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही स्थानकांवर बोर्ड लावले असून, सतत सूचनाही देण्यात येत आहेत. रेल्वे स्थानकावर येणा-या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडू नये यासाठी आम्ही सूचना फलक लावले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा घोळका दिसल्यास त्यांना प्रत्यक्ष तोंडी माहितीही देण्यात येत आहेत, अशी माहिती चिंचपोकळीचे सहाय्यक स्टेशन अधिक्षक विनायक शेवाळे यांनी दिली. विद्यार्थी हार्बर मार्गाने अथवा बेस्ट बसने प्रवास करू शकतात अशा प्रकाशाच्या सूचना स्टेशनवर देण्यात येत आहेत.