वेगवान प्रवासासाठी आणि नव्या गाडय़ा चालण्यासाठी डीसी-एसी परिवर्तन अत्यावश्यक असल्याचा प्रचार मध्य रेल्वेकडून जोमाने झाला असला, तरी प्रत्यक्षात नव्या गाडय़ांची भर पडणार नसतानाच रेल्वे प्रवासही मंदावणार असल्याने नोकरदार प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस यादरम्यान मुख्य मार्गावर तब्बल नऊ ठिकाणी ८ जूननंतर वेगमर्यादा घालण्यात येण्याची शक्यता आहे. ही वेगमर्यादा १५ किलोमीटर प्रतितास एवढी कमी असण्याची शक्यता आहे. 

रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी मध्य रेल्वेवर दररोज रात्री डीसी-एसी परिवर्तन कामाचे परीक्षण करीत आहेत. या परीक्षणात डीसी-एसी परिवर्तनात कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यादरम्यान नऊ ठिकाणी असलेल्या पुलांची उंची काळजीची ठरत आहे. ओव्हरहेड वायर आणि पूल यांच्यातील अंतर किमान २५० मिमी असावे, असा नियम आहे. मात्र टिळकनगर, हँकॉक पूल, कारनॅक पूल, करीरोड पूल, भायखळा येथील एस पूल, किंग्ज सर्कल या सहा आणि इतर तीन ठिकाणचे पूल येथे हे अंतर त्यापेक्षा कमी आहे. गाडी जात असताना पेण्टोग्राफमधील तणावामुळे ओव्हरहेड वायर ५० मि.मी. वर उचलली जाते. त्यामुळे ओव्हरहेड वायर आणि त्यावरील पृष्ठभाग यातील अंतर आणखी कमी होते. या पुलांपैकी बहुतांश पुलांची बांधणी करताना लोखंडाचा वापर केला आहे. परिणामी विद्युतप्रवाह पुलांमध्ये पसरण्याचा संभव आहे. त्यामुळे लोकांना धोका पोहोचू शकतो, असे निरीक्षण बक्षी यांनी नोंदवले आहे. विशेष म्हणजे हँकॉक पूल आणि ओव्हरहेड वायर यातील अंतर केवळ १७० मि.मी. एवढे आहे.
त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मध्य रेल्वेला या नऊ ठिकाणी १५ किलोमीटर प्रतितास एवढी वेगमर्यादा घालण्याची सूचना केली आहे. आता चेतन बक्षी यांचे परीक्षण झाल्यावर ते पुन्हा काही नोंदी करून मध्य रेल्वेला परवानगी देतील. मध्य रेल्वेतील सूत्रांच्या माहितीनुसार ८ जून रोजी डीसी-एसी परिवर्तनाचे काम होणार आहे. त्यामुळे त्यापुढे मध्य रेल्वेवर कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान गाडय़ा कूर्मगतीने चालण्याची शक्यता आहे. परिणामी प्रवासाचा वेळही वाढणार आहे. त्यामुळे डीसी-एसी परिवर्तनामुळे प्रवाशांचा फायदा काय, हा प्रश्न प्रवाशांना पडण्याची शक्यता आहे.