कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ गॅस पाइपलाइनला गळती लागली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  मुंबईच्या महानगर गॅस पाइपलाइनला गळती लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी याबाबत तत्काळ महानगर गॅसपाइप लाइन आणि अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

गॅस पाइपलाइनला फुटण्याची किंवा गळतीची ही या महिन्यातील दुसरी घटना आहे. २१ मार्चला दुसरे एक काम सुरू असताना जेसीबीचा पाइपलाइनला धक्का लागल्याने पाइप फुटला आणि त्यातून गॅस गळती सुरू झाली. गांधी नगर जंक्शनजवळ लाल बहादूर शास्त्रीनगर येथे ही घटना घडली होती. गॅस पाइप लाइनमधून प्रचंड दबावाने गॅस निघाला आणि जवळच असलेल्या हाय टेंशन वाइरच्या संपर्कात आला. त्यातून त्या ठिकाणी आग लागली आणि त्यात सात जण गंभीररित्या जखमी झाले होते.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कांदिवली येथे झालेल्या लिकेजचे कारण अद्याप समजले नाही.