श्वसनाचा त्रास, स्नायूंवर अतिरिक्त दाब आल्याच्या तक्रारी

रविवारचा दिवस आणि त्यातच बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत हजारो संख्येने मुंबईकर मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. धावत असताना श्वसनाचा त्रास, स्नायूंवर अतिरिक्त दाब अशा कारणांमुळे सुमारे २५०० मुंबईकर जखमी झाले. मुख्य मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक छोटय़ा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातून निवड केलेल्या स्पर्धकांनाच मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची परवानगी होती. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याचे आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे.

१४ व्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते रविवारी पहाटे झाले. त्यानंतर ४२ किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झाली. मुख्य मॅरेथॉनसाठी स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस-वांद्रे-छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ४२ किलोमीटरचे अंतर पार केले. याव्यतिरिक्त २१ किलोमीटरचा मॅरेथॉन, ड्रीम रन, अपंगांची मॅरेथॉन या मॅरेथॉनसाठीही नागरिक उत्साहाने सहभागी झाले.

२.४ किलोमीटरची अपंगांची मॅरेथॉन सीएसटीहून सुरू झाली आणि मेट्रो चित्रपटगृहासमोर थांबली. एशियन हार्ट इन्स्टिटय़ूट या संस्थेने मॅरेथॉनमध्ये आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदरी घेतली होती. याच ११ रुग्णवाहिका, दुचाकीवरून औषध पुरविणारे सात सदस्य, ११ आरोग्य केंद्र आदी सेवा स्पर्धकांना देण्यात आल्या. यात २५०० जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार देण्यात आले. यातील जखमी सहा स्पर्धकांना बॉम्बे रुग्णालय, दोघांना हिंदूजा, दोघांना लीलावती आणि एका स्पर्धकाला जसलोक रुग्णालयात हलविण्यात आले. याव्यतिरिक्त शरीरातील पाण्याची कमतरता, शुद्ध हरपणे, स्नायूंवर ताण आदी त्रास असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईकर अधिक फिट असल्याचे दिसले, असे एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटचे मेडिकल संचालक डॉ. विजय डिसिल्वा यांनी सांगितले.

जनजागृतीसाठी मॅरेथॉन

मॅरेथॉनमध्ये विविध सामाजिक संदेश घेऊन नागरिक सहभागी झाले होते. कुटुंब नियोजनाबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी फॅमिली प्लानिंग असोसिएशनचे सदस्य मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मोटरन्युरो या हाडांच्या विकाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मुंबईतील आशा एक होप फाउंडेशनचे डॉ. संकेत इनामदार यांनी २१ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. राज्यात ६,०५० मोटरन्युरो आजाराचे रुग्ण असून भारतात याची संख्या ८० हजारांहून अधिक आहे. या आजारात हाडांमध्ये दोष आढळल्यानंतर चालणे, बोलणे या क्रियेवर परिणाम होतो आणि कालांतराने रुग्ण दगावतो. दिवसेंदिवस हे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. या आजाराबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

पोलीस उपआयुक्त कोसळले..

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले औरंगाबाद येथील ४७ वर्षीय पोलीस उपआयुक्त निसार तांबोळी धावत असताना अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने जसलोक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही काळासाठी त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता. तांबोळी यांना मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास नाही, मात्र गेल्या काही दिवसांत शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना भोवळ आली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे.

धावण्याची इच्छापूर्ती..

सात वर्षांपूर्वी बायपास झालेल्या ६७ वर्षीय के.एस.रामचंद्रन यांनी २१ किलोमीटरची मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. २०१३ मध्ये ड्रीम रनमध्ये सहभागी झाल्यानंतर २१ किमीचे ध्येय घेऊन ते धावण्याचा सराव करीत आहेत. तर हसमुख शहा (५३) यांना  ५ एप्रिल २०१३ मध्ये हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये २१ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली आणि यंदाही त्यांनी यशस्वीपणे ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे. मध्य रेल्वेचे तिकीट तपासनीस सचिन पाटील चौथ्यांदा विजयी झाले.