मुंबई महापालिकेमधील विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असताना सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पाच नामनिर्देशीत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली. त्यापैकी शिवसेनेच्या एका नामनिर्देशीत नगरसेवकाने अवयवदान आणि वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला असून महापौर आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठात्यांना अवयवदानाबाबत पत्रही पाठविले आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या वाटय़ाला प्रत्येकी दोन, तर काँग्रेसच्या पदरात एक नामनिर्देशीत नगरसेवक पद पडले आहे. शिवसेनेने माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे नारायण राणे यांचा पराभव होईपर्यंत चप्पलचा त्याग करणारे शिवसैनिक अरविंद भोसले यांना नामनिर्देशीत नगरसेवकपद बहाल केले आहे. नामनिर्देशीत नगरसेवकपदासाठी भाजपने गणेश खणकर व श्रीनिवास त्रिपाठी यांचे, तर काँग्रेसने सुनील नरसाळे यांचे नाव सूचित केले होते. विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी पालिका सभागृहामध्ये या पाच जणांच्या नावाची घोषणा केली. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी नामनिर्देशीत नगरसेवकांना सभागृहात येण्यास परवानगी देण्याची मागणी महापौरांकडे केली. विश्वनाथ महाडेश्वर यांनी तात्काळ ही मागणी मान्य केली आणि पाचही सदस्य सभागृहात आसनस्थ झाले. नामनिर्देशीत नगरसेवकपदावर नियुक्ती होताच अरविंद भोसले यांनी अवयव दानाच्या चळवळीचा संकल्प सोडला.