मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, असे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत ए, बी आणि ई प्रभाग समितीचे अध्यक्ष मनोज जामसुतकर यांनी स्नेहल आंबेकर यांना सादर केलेल्या पत्रावर महापौर दालनामध्ये मंगळवारी आयोजित गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा, एसव्हीआर श्रीनिवास, मोहन अडतानी, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर आणि सर्व पक्षांचे गटनेते
उपस्थित होते. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून भटक्या कुत्र्यांमुळे जनमानसामध्ये भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी कुत्र्यांच्या भीतीमुळे लहान मुलांना खेळण्यास पाठविणेही
अवघड झाले आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, असे आदेश महापौरांनी दिले.