‘मेक इन महाराष्ट्र’ची संकल्पना राबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावले टाकत असताना विक्रीकर आणि ‘इन्स्पेक्टर राज’ ला कंटाळून मुंबईतील धातूबाजार (मेटल मार्केट) व्यापाऱ्यांनी गुजरातला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटल्यानंतरही काहीच निर्णय न झाल्याने या वापाऱ्यांच्या असोसिएशनच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पदाधिकारी प्रवीण बोहरा यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली. धातूबाजारमध्ये सुमारे चार ते साडेचार हजार व्यापारी असून ३० हजाराहून अधिक कर्मचारी त्यांच्याकडे काम करीत आहेत. त्यांच्या रोजीरोटीवरही गंडांतर येण्याची चिन्हे आहेत.
हा धातूबाजार अहमदाबादजवळील अडालज येथे अदानी समूहाकडून उभारल्या जात असलेल्या औद्योगिक विभागात स्थलांतरित होणार आहे. व्यापाऱ्यांना दुकान, राहण्याची जागा व अन्य सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. अन्य सर्व पायाभूत सुविधाही तेथे मिळणार असून व्यापाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच अहमदाबाद येथे जाऊन अडाणी समूहातील उच्चपदस्थांशी चर्चा करणार आहेत. कोणकोणत्या सोयीसवलती मिळतील, याचा तपशील ठरविल्यावर स्थलांतर करण्यासाठीचे करारमदार होतील आणि पुढील दोन-तीन वर्षांत हा बाजार संपूर्णपणे मुंबईतून अहमदाबादला जाईल, असे बोहरा यांनी स्पष्ट केले.
नरसिंह जैन यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची सर्वसाधारण सभा शनिवारी मुंबईत झाली. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांना भेटूनही कोणताही निर्णय होत नाही. विक्रीकर विभाग आणि इन्स्पेक्टर राजमध्ये सुधारणा होत नाही. अन्य यंत्रणांकडूनही त्रास होत आहे. शासकीय तिजोरीला फटका बसावा, असे आम्हाला वाटत नाही. पण व्यवसाय करण्यासाठी योग्य परिस्थिती नाही. महाराष्ट्राचा उद्योग व व्यवसायात प्रथम क्रमांक रहावा, असे आम्हालाही वाटते. आमची गोदामे भिवंडी व कळंबोलीला आहेत. पण जो त्रास होत आहे, त्यामुळे गुजरातला स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नसून या निर्णयाला बहुसंख्य व्यापाऱ्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याची माहिती बोहरा यांनी दिली.